25 April 2019

News Flash

राष्ट्रकुलमधून नेमबाजी बाद होणे क्लेशकारक!

सुवर्णपदक जिंकणाऱ्या हीना सिधूने भारतीय नेमबाजीचे नाव उज्ज्वल केले आहे.

हीना सिधू, (आंतरराष्ट्रीय नेमबाज)

आठवडय़ाची मुलाखत : हीना सिधू, (आंतरराष्ट्रीय नेमबाज)

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत प्रशिक्षक व पती रोनक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णपदक जिंकणाऱ्या हीना सिधूने भारतीय नेमबाजीचे नाव उज्ज्वल केले आहे. मात्र पुढील राष्ट्रकुलमधून नेमबाजी स्पर्धा रद्द करण्याच्या निर्णयावर तिने खंत व्यक्त केली. आगामी विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या तयारीविषयी नेमबाजपटू हीनाशी केलेली ही खास बातचीत-

* राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतरच्या तुझ्या भावना काय होत्या?

खरे सांगायचे तर मला अतिशय आनंद झाला होता. कारण या क्रीडा प्रकारात मी अजूनही नवखी आहे. माझा अंतिम गुणफलक हा विश्वविक्रमापासून अवघ्या एका गुणापासून वंचित राहिला. तरीही या कामगिरीतून २०२०च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत चांगल्या कामगिरीसाठी माझा आत्मविश्वास उंचावला आहे. तेथे मी नक्कीच दोन पदकांची अपेक्षा करू शकते. १० मीटर पिस्तूल प्रकारातील सुवर्ण थोडक्यात हुकले, मात्र भारतीय खेळाडूनेच या गटात सुवर्णपदक पटकावल्याचा मला आनंद आहे. १० मी. पिस्तूल प्रकारातील चुकांवर मी काम करत असून त्यात लवकरच सुधारणा दिसून येईल.

* भारतीय नेमबाजांच्या राष्ट्रकुलमधील कामगिरीविषयी तुला काय वाटते?

मला संपूर्ण नेमबाजी पथकाचा अभिमान वाटतो. आम्ही सर्वानीच उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मात्र माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याचे काम मी करत असून त्यामध्ये १०० टक्के योगदान देण्याचा प्रयत्न मी प्रत्येक स्पर्धेत करते.

* प्रशिक्षक रोनक पंडित यांच्याविषयी काय सांगशील?

रोनक यांच्याविषयी मी काय बोलणार. मला वाटते, रोनक हे भारतीय नेमबाजी संघाला लाभलेले सवरेत्कृष्ट प्रशिक्षक आहेत. त्यांनी माझ्या कमतरतेवर कसून मेहनत घेतली. मी कोणतीही स्पर्धा जिंकल्यानंतरही आम्ही कामगिरीतील सुधारणांविषयीच चर्चा करतो आणि हीच आमच्यातील उत्तम गोष्ट आहे. माझ्या सुवर्णपदकासाठी रोनक यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. नेमबाजीचे प्रशिक्षण करताना आम्ही फक्त गुरू-शिष्य नात्याने कार्यरत असतो. म्हणूनच आमच्यातील ताळमेळ अप्रतिम आहे.

* २०२२ पासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजीच्या स्पर्धा हद्दपार करण्यात येणार आहेत, याचा काय परिणाम होईल असे तुला वाटते?

राष्ट्रकुल स्पर्धामधून नेमबाजी बाद होणे ही अतिशय दु:खद गोष्ट आहे. हा एक ऑलिम्पिक खेळ आहे. या खेळातून किती नफा होतो हे पाहण्यापेक्षा, किती खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतात याकडे लक्ष दिले पाहिजे. मला या निर्णयामागील तथ्यच कळत नाही. राष्ट्रकुल स्पर्धामधून नेमबाजी बाद करण्यात आल्याने भारताला असंख्य पदकांवर पाणी सोडावे लागू शकते. ऑलिम्पिकमध्ये खेळणे हेच कोणत्याही युवा खेळाडूचे स्वप्न असते. त्यामुळे युवा पिढीने मेहनत घेऊन ध्येयपूर्ती करण्यासाठी झटले पाहिजे.

* आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेकडे कशी पाहतेस?

आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर सुरू होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी माझी मुख्य तयारी चालली आहे. या स्पर्धेत सवरेत्कृष्ट कामगिरी करून ऑलिम्पिकसाठी पात्रता गााठण्याचे माझे ध्येय आहे. २०२० मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धासाठीच ही एकप्रकारे पूर्वतयारी आहे.

* दबावाखाली कामगिरी करताना कोणत्या योजनांचे पालन करतेस?

येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी मी नेहमी तयार असते. संपूर्ण नियोजन करूनच मी कोणतेही काम करते. येणाऱ्या अडथळ्याची तुम्ही आधीच अपेक्षा बाळगली पाहिजे व त्यानुसार रणनीती तयार केली पाहिजे. मिळालेली संधी आपल्या बाजूने कशी वळवता येईल याचा अंदाज घेता आला पाहिजे. तसेच तंदुरुस्ती, आहार, चिंतन या सर्व गोष्टींचा योग्य मेळ साधल्यावरच सुवर्णपदक जिंकता येते.

First Published on April 16, 2018 3:01 am

Web Title: international shooter heena sidhu interview for loksatta