आठवडय़ाची मुलाखत – पूरव राजा, आंतरराष्ट्रीय टेनिसपटू

सुप्रिया दाबके, लोकसत्ता

भारतात लिएण्डर पेस, महेश भूपतीसारखे गुणवान टेनिसपटू घडले. मात्र अजूनही युरोप किंवा अमेरिका खंडातील टेनिसशी तुलना के ल्यास भारताला या खेळात मोठी उंची गाठावी लागेल, असे मत आंतरराष्ट्रीय स्तरावर दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पूरव राजाने व्यक्त केले.

पुरुष दुहेरीत रामकुमार रामनाथनच्या साथीने कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न, भारताच्या टेनिसचे भवितव्य आणि सध्याच्या टेनिसपटूंची कामगिरी यांसारख्या विविध आव्हानांबाबत ३४ वर्षीय पूरवशी केलेली ही खास बातचीत—

* खेळाडू म्हणून कोणते ध्येय ठेवले आहे?

माझे ध्येय जागतिक टेनिस क्रमवारीत दुहेरीत ५०मध्ये यायचे आहे. रामकुमारच्या साथीने गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून मी दुहेरीत खेळत आहे. मात्र ग्रॅँडस्लॅममध्ये खेळताना दुहेरीत लवकर पराभूत होणे हे निराशाजनक असते. त्याचा परिणाम क्रमवारीवर होतो. आम्ही ग्रँडस्लॅममध्येही यश मिळवू अशी अपेक्षा आहे. पण तरीही रामकु मारच्या साथीने खेळण्याचा माझा निर्णय योग्य होता. कारण त्याच्यासह खेळताना माझा खेळ उंचावतो आहे. जपानमधील कोबे स्पर्धेसह पुण्यातील ‘एटीपी’ स्पर्धा एकत्र खेळलो. पाठोपाठ फेब्रुवारीत बेंगळूरुतील चॅलेंजर स्पर्धेत दुहेरीत विजेतेपद पटकावले. आम्ही तीन महिन्यांमध्ये तीन चॅलेंजर स्पर्धाची विजेतेपदे पटकावली.

* भारतीय टेनिसचे भवितव्य कसे असावे असे वाटते?

रशिया, सर्बिया, ऑस्ट्रेलिया यांच्या तोडीचा भारतीय टेनिसपटूंचा खेळ नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र गेल्या काही वर्षांत चांगले खेळाडू देशात तयार झाले आहेत. दिविज शरण, प्रज्ञेश गुणेश्वरन, सुमीत नागल, रामकुमार रामनाथन यांच्यासारखे काही खेळाडू सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र भारताचे टेनिस उंचावण्यासाठी अजून काही काळ जावा लागेल. अजूनही भारतात टेनिस कारकीर्द निवडणे सोपे नाही. टेनिस खेळाला संघटनेपासून प्रत्येक पारडय़ावर प्रोत्साहन देशात अपेक्षित आहे. सध्या सर्बिया, जर्मनी यांच्याशी तुलनाच होऊ शकत नाही. मात्र भारतीय उपखंडात सर्वात चांगली कामगिरी करणारे खेळाडू आपल्याकडे आहेत. भविष्याचा विचार करण्याआधी सध्या चांगली कामगिरी करण्यावर भर असेल.

* करोना काळात विविध टेनिस स्पर्धा होत आहेत, त्याविषयी काय सांगाल?

सध्या अनेक स्पर्धा होत आहेत, मात्र त्या सर्वासाठी गरजेच्या आहे. खेळाडूंना नेहमीच स्पर्धा सर्वात महत्त्वाच्या असतात. अमेरिकन आणि फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धाचे प्रेक्षकांशिवाय यशस्वी आयोजन झाले. मात्र ग्रँडस्लॅम स्पर्धामधील या खेळाडूंच्या खेळाचा आनंद टीव्हीवर घेता आला. वर्षांतील चार ग्रँडस्लॅम आणि एटीपी स्पर्धा या टेनिस खेळाचे महत्त्व राखण्यासाठी कठीण काळातही आवश्यक असतात. पुढील वर्षांतील टेनिस हंगामाची चांगली सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे.

* टेनिस खेळात कारकीर्द करण्याचे कसे ठरवले आणि ही निवड सार्थ वाटते का?

माझ्या वडिलांची प्रेरणा या खेळाकडे वळण्यासाठी मोठी आहे. वयाच्या १२व्या वर्षांपासून टेनिसकडे गंभीरपणे पाहत आहे. लहान वयापासून विविध टेनिस स्पर्धामध्ये सहभाग घेतला. त्यात जे यश मिळाले ते पाहता योग्य खेळाची निवड कारकीर्द घडवण्यासाठी केली, याची खात्री पटली.

* तुझा ऑनलाइन कार्यक्रम सध्या सुरू आहे, त्याविषयी सांग?

टाळेबंदी सुरू झाल्यापासून ‘सोनी सिक्स’ वाहिनीवर ‘सोनी टेन चाय विथ राजा’ हा कार्यक्रम सध्या मी करत असून त्याद्वारे विविध आजी-माजी खेळाडूंशी संवाद साधत आहे. हा कार्यक्रम किती प्रसिद्ध आहे हे माहिती नाही. मात्र माझ्यासाठी एक वेगळे व्यासपीठ खेळाव्यतिरिक्त माझी गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी चांगले ठरले आहे.