महिलांची २५ हजार डॉलर्स (सोळा लाख रुपये) पारितोषिकाची आंतरराष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धा येथे नऊ जानेवारीपासून सुरू होत आहे. त्यामध्ये सतरा देशांमधील अनुभवी खेळाडू सहभागी झाल्या आहेत.
गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलात होणाऱ्या या स्पर्धेत भारताची अव्वल मानांकित अंकिता रैना हिच्याकडून विजेतेपदाची अपेक्षा केली जात आहे. वेलरिया स्त्रिकोव्हा (युक्रेन), अयाका ओकुनो (जपान), मेलोनेई क्लॅफनर (ऑस्ट्रिया), लुई ब्रेव्हली (फ्रान्स), चिंग वेन सुओ (चीन तैपेई), ताडजो मॅजरिक (स्लोव्हाकिया), मेलिस सीझर (टर्की) यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
स्पर्धेतील पहिले दोन दिवस पात्रता फेरीचे सामने होणार असून मुख्य फेरीस ११ जानेवारी रोजी प्रारंभ होईल. एकेरीतील विजेत्या खेळाडूस तीन हजार ९१९ डॉलर्स, तर उपविजेत्या खेळाडूस २ हजार ९१ डॉलर्सचे पारितोषिक दिले जाणार आहे. १६ जानेवारी रोजी एकेरीचा अंतिम सामना होणार आहे.
स्पर्धेसाठी आयटीएफ निरीक्षक म्हणून शीतल अय्यर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी ब्राँझ बॅच पंच म्हणून श्रीराम गोखले हे काम पाहणार आहेत.