आठवडय़ाची मुलाखत : नरसिंह यादव, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू

प्रशांत केणी, लोकसत्ता

मुंबई : खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकून देण्याचे स्वप्न मी जोपासले आहे. स्वत:चा सराव आणि महाराष्ट्रातून दर्जेदार कुस्तीपटू घडावेत, यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची अकादमी स्थापन करण्याची माझी इच्छा आहे, असा निर्धार कुस्तीपटू नरसिंह यादवने व्यक्त केला.

२०१६मध्ये उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (वाडा) घातलेली नरसिंहवरील चार वर्षांची बंदी काही दिवसांपूर्वी संपली आहे. या बंदीमुळे रिओत पोहोचूनही ऑलिम्पिक सहभागाची त्याची संधी हिरावली होती. पण टोक्यो ऑलिम्पिक लांबणीवर पडताच बंदी संपल्यामुळे आता पात्रतेचे स्वप्न त्याला खुणावते आहे. बंदीचा काळ आणि भविष्यातील आव्हाने याबाबत नरसिंगशी केलेली खास बातचीत –

* बंदीच्या चार वर्षांकडे कशा रीतीने पाहिलेस आणि त्यातून तू काय शिकलास?

कठीण काळातच माणसाला आयुष्याचे धडे मिळतात, असे म्हणतात, तेच माझ्याबाबतीतही घडले. उगवत्या सूर्याला दंडवत घालण्याची देशात मानसिकता आहे, याचा अनुभव मी प्रत्याक्षात घेतला. मी कोणतीही चूक केली नव्हती, त्यामुळे माझ्याबाबत काहीच चुकीचे घडणार नाही, हा विश्वास होता.

* बंदीच्या कठीण कालखंडात कुटुंबाने कशी साथ दिली?

माझी पत्नी, कुटुंबीय आणि प्रशिक्षकांनी या कठीण काळात दिलेली साथ मला महत्त्वाची वाटते. माझी पत्नी शिल्पी हीसुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्तीपटू आहे. खेळाडूची कारकीर्द आणि त्याच्यापुढील आव्हानांची तिला उत्तम जाण आहे. बंदीचा काळ संपला की, झोकात पुनरागमन करू शकेन, हा विश्वास तिने मला दिला. तिच्या प्रेरणेनेच मला कुस्तीमध्ये टिकून राहण्याचे बळ मिळाले.

* गेल्या काही वर्षांत सराव कसा सुरू आहे?

गेली चार वर्षे माझा मुंबईतच सातत्याने सराव सुरू आहे. मुंबई पोलीस दलात नोकरीवर असल्याने तिथे मला उत्तम सराव करता आला. टाळेबंदीच्या कालखंडात राष्ट्रीय शिबिरे स्थगित झाली आहेत. परंतु येत्या काही दिवसांत शिबिरे पुन्हा सुरू होतील आणि मला त्यात सामील होता येईल, अशी आशा आहे.

* टोक्यो ऑलिम्पिक पात्रतेचे आव्हान कितपत खडतर असेल?

करोनाची साथ जगभरात पसरल्याने टोक्यो ऑलिम्पिक वर्षभराने लांबले आहे. त्यामुळे स्पर्धात्मक तयारीसाठी मला एक वर्ष मिळणार आहे. कुस्तीमधील ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे माझे स्वप्न आहे. त्या दृष्टीने भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी आता मी अतिशय मेहनत करीत आहे.

* ऑलिम्पिक पात्रतेची तयारी करताना कोणत्या वजनी गटात सहभागी होशील?

मी ७४ किलो वजनी गटात खेळण्याच्या दृष्टीनेच सराव सुरू केल्याचे भारतीय कुस्ती महासंघाला कळवले आहे. या वजनी गटात दोन ऑलिम्पिक पदके विजेत्या सुशील कुमारसह असंख्य कुस्तीपटूंचा समावेश आहे, परंतु देशातील एकच मल्ल ऑलिम्पिकसाठी पात्र ठरेल. वर्षांच्या उत्तरार्धात बेलग्रेड (सर्बिया) येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेद्वारे पुनरागमन करीत ऑलिम्पिक पात्रता गाठण्याचे माझे लक्ष्य आहे.

* करोनाच्या पार्श्वभूमीवरील टाळेबंदीचा काळ एका कुस्तीपटूसाठी किती आव्हानात्मक ठरतो आहे?

टाळेबंदीच्या काळात गेले काही महिने माझ्यासह अनेक मल्ल घरीच सराव आणि तंदुरुस्तीकडे लक्ष केंद्रित आहेत. अनेक मल्लांचा मातीवरील कुस्त्यांच्या दंगलीत सहभागी होऊन मिळालेल्या पैशांतून चरितार्थ चालायचा. पण स्पर्धाच खंडित झाल्याने त्यांना नेहमीचा आहार कसा झेपवायचा, घर कसे चालवायचे असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पण परिस्थितीशी झुंज देत ते टिकण्याचा प्रयत्न करीत आहेत.