भारताची मलेशियासमोर कसोटी

पुढील वर्षी भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पध्रेची पूर्वतयारी म्हणून गोव्यात अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) युवा चषक फुटबॉल स्पध्रेला रविवारपासून सुरुवात होत आहे. यजमान भारतासमोर पहिल्याच सामन्यात मलेशियाचे आव्हान आहे, तर अमेरिका आणि तन्झानिया यांच्यात दुसरा सामना होणार आहे.

‘ही स्पर्धा भारतीय खेळाडूंच्या तयारीची चाचपणी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे,’ असे मत भारतीय संघाचे प्रशिक्षक निकोलाई अ‍ॅडम यांनी सांगितले. भारतासह अमेरिका, कोरिया, मलेशिया आणि तन्झानिया या पाच देशांचा स्पध्रेत समावेश आहे. एआयएफएफच्या आयोजनाखाली या स्पध्रेचे आयोजन करण्यात आले आहे. अ‍ॅडम म्हणाले की, ‘१७ वर्षांखालील विश्वचषक स्पध्रेची तयारी, हे आमचे मुख्य ध्येय आहे. त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये होणाऱ्या एएफसी १६ वर्षांखालील अजिंक्यपद स्पध्रेच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वपूर्ण आहे. या स्पध्रेतून भारतीय संघाला चांगला अनुभव मिळणार आहे.’