राष्ट्रीय आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेला शुक्रवारपासून प्रारंभ होणार असून, द्युती चंद आणि हिमा दास यांना ही ऑलिम्पिक पात्रतेची अखेरची संधी असेल.

या पाचदिवसीय स्पर्धेला जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेकडून ‘ब’ श्रेणीचा दर्जा प्राप्त झाला असून, पात्रतेच्या ‘अ’ निकषांची पूर्तता केल्यास भारतीय अ‍ॅथलेटिक्सपटूंना ऑलिम्पिकसाठी थेट पात्र होता येईल.

भालाफेकपटू नीरज सिंग आणि ३०० मीटर स्टीपलचेसपटू अविनाश साबळे हे दोन ऑलिम्पिकपात्र खेळाडू सध्या सराव-वजा-स्पर्धेसाठी युरोपात असल्यामुळे या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.

सोमवारी झालेल्या इंडियन ग्रां. प्रि. अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील १०० मीटर शर्यतीत द्युतीने सुवर्णपदकासह स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडला. परंतु ऑलिम्पिक पात्रतेची ११.१५ सेकंदांची वेळ दोन शतांश सेकंदांमुळे हुकली. २०० मीटर शर्यतीत हिमाने वैयक्तिक सर्वोत्तम २०.८८ सेकंदांच्या वेळेसह सुवर्णपदक मिळवले. परंतु ०.०८ सेकंदांनी ऑलिम्पिक पात्रतेने तिला हुलकावणी दिली.

हिमा, द्युती, अर्चना सुशींद्रन आणि एस. धनलक्ष्मी ४ बाय १०० मीटर रिले प्रकारात पात्रतेसाठी उत्सुक आहेत. पुरुषांच्या ४ बाय ४०० मीटर प्रकारात मोहम्मद अनास याहिया, अमोज जेकाब, अरोकिया राजीव, नोआह निर्मल टॉम यांचा समावेश आहे.