अमोल मुझुमदार, दक्षिण आफ्रिकेचे फलंदाजी प्रशिक्षक

प्रशांत केणी

भारताच्या गोलंदाजीकडे फिरकीच्या नजरेतून पाहणे चुकीचे ठरेल. या संघाकडे सध्या तरी जागतिक दर्जाचा अष्टपैलू गोलंदाजीचा मारा आहे. वेगवान आणि फिरकी गोलंदाजीचा सुरेख समन्वय असलेल्या माऱ्याचे प्रमुख आव्हान आमच्यापुढे असेल, असे मत दक्षिण आफ्रिकेचे फलंदाजीचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी व्यक्त केले.

‘‘भारतातील खेळपट्टय़ांवर फिरकीचे वर्चस्व गेली अनेक वर्षे दिसून आले आहे; परंतु आता तशी स्थिती राहिलेली नाही. भारताकडे जसप्रित बुमरासारखा जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर भारताच्या गोलंदाजीच्या माऱ्याची प्रचीती आलेली आहे. त्यामुळे भारत दौऱ्यावर योग्य रणनीती आखून खेळावे लागणार आहे,’’ असे मुझुमदार यांनी सांगितले. भारत दौऱ्यावरील दक्षिण आफ्रिकेसमोरील आव्हाने आणि प्रशिक्षकपदाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या संदर्भात मुझुमदार यांच्याशी केलेली खास बातचीत-

* इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आफ्रिकेचा संघ झगडताना आढळला. या संघाचे मनोबल उंचावण्याचे आव्हान तुमच्यावर असेल का?

अनुभवी खेळाडूंवर अपेक्षांचे खूप मोठे ओझे असते. जुन्या रणनीतीलाच ही मंडळी श्रेष्ठ मानतात; पण दक्षिण आफ्रिकेचे बरेच मातब्बर खेळाडू निवृत्त झाले आहेत. त्यामुळे नव्या खेळाडूंसह संघबांधणीचे प्रमुख आव्हान मार्गदर्शक चमूवर असेल. हे नवे खेळाडू प्रत्येक आव्हानाकडे नव्या रणनीतीने पाहतात, हेच आमचे बलस्थान असते.

* नेदरलँड्ससाठी फलंदाजीचे सल्लागारपद भूषवल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेसारख्या नामांकित संघाला फलंदाजीचे मार्गदर्शन करण्याचा मान मिळाला आहे. याकडे तुम्ही कसे पाहता?

हा दौरा नक्कीच आव्हानात्मक आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघात मोठय़ा प्रमाणात युवा खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा उत्तम अनुभव असेल. आफ्रिकेसारख्या संघाला फलंदाजीसाठी मार्गदर्शन करणे, ही माझ्यासाठी सुवर्णसंधीच आहे. त्यांच्या फलंदाजीला माझ्या मार्गदर्शनाचा निश्चितच फायदा होईल.

* भारताच्या फलंदाजीच्या प्रशिक्षकपदासाठी तुम्हीसुद्धा स्पर्धेत होतात. यंदा तुम्हाला संधी मिळाली नसली तरी देशासाठी मार्गदर्शनासंदर्भात कोणती स्वप्ने तुम्ही जोपासली आहेत?

भारताच्या प्रशिक्षकपदासाठीच्या निवड प्रक्रियेचा अनुभव उत्तम होता. माझे सादरीकरणही चांगले झाले; पण भविष्यात देशासाठी मार्गदर्शनाची जबाबदारी सांभाळायला नक्की आवडेल.

* प्रशिक्षकपदाच्या कारकीर्दीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे?

क्रिकेटची साथ आयुष्यभर असेल. २५ वर्षे खेळपट्टीवर क्रिकेटपटू म्हणून घडलो. आता पुढील २५ वर्षे याच मैदानावर मार्गदर्शनाचे धडे देत खेळाडूंची गुणवत्ता जोपासायची आहे.

* रमाकांत आचरेकर सरांकडून खेळाडू म्हणून घडताना संस्कारात्मक मूल्यशिक्षणसुद्धा मिळते. आता प्रशिक्षक म्हणून कारकीर्द चालू असताना यापैकी कोणते मूल्य मोलाचे वाटते?

आचरेकर सर नेहमी सांगायचे की, क्रिकेट हा खेळ सर्वात मोठा आहे. त्याच्यापुढे जाण्याचा कधीच प्रयत्न करू नका, हे कोणत्याही क्रिकेटपटूने नेहमी ध्यानात ठेवायला हवे. त्यामुळे खेळाच्या साथीनेच कारकीर्दीची वाटचाल करणे महत्त्वाचे असते. तुम्ही खेळापेक्षा मोठे होण्याचा प्रयत्न केलात, तर हा खेळ तुम्हाला तुमची जागा दाखवतो.