22 September 2020

News Flash

‘प्रो कबड्डी’ सोनू नरवालसाठी वरदान

‘‘प्रो कबड्डी लीगमुळे या खेळाचा प्रसार व प्रचार खेडोपाडी झाला आहे.

कबड्डी या खेळाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून देण्याचे कार्य प्रो कबड्डी लीग करीत असून, ही लीग भारतीय खेळांसाठी वरदानच ठरली आहे, असे पुणेरी पलटण संघाकडून खेळणाऱ्या सोनू नरवालने सांगितले.

सोनू हा खोलवर चढाया करण्यात पटाईत असून, त्याने पुण्याच्या संघाकडून खेळताना आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला आहे. त्याच्या कामगिरीमुळेच पुण्याला या मोसमात साखळी गटामध्ये आघाडीस्थानावर झेप घेता आली आहे.

‘‘प्रो कबड्डी लीगमुळे या खेळाचा प्रसार व प्रचार खेडोपाडी झाला आहे. आमच्या सोनपतमध्येही रस्त्याने चालताना मला एखाद्या सेलिब्रिटीसारखाच अनुभव पाहावयास मिळतो. अनेक मुले-मुली माझ्याबरोबर छायाचित्रे काढण्यासाठी उत्सुक असतात. केवळ सोनपत नव्हे तर अन्य अनेक ठिकाणीही मला मुख्य पाहुणा म्हणून बोलाविले जाते हा सारा अनुभव मला खूप वेगळा आहे,’’ असे सोनूने सांगितले.

तो पुढे म्हणाला, ‘‘या लीगमुळे आमच्या खेळाचा चेहरामोहराच बदलला आहे. एरवी राष्ट्रीय स्पर्धेत चमक दाखविली तरी आमचे फारसे कौतुक होत नव्हते, आता माझे पोस्टर्स पाहिल्यानंतर खूप हसू येते.’’

या लीगमुळे कितपत आर्थिक पाठबळ मिळाले आहे असे विचारले असता सोनू म्हणाला, ‘‘पोलीस दलात मला कबड्डी खेळामुळे नोकरी मिळाली आहे. नियमित आर्थिक उत्पन्न येत असले तरी प्रो लीगद्वारा मिळालेल्या उत्पन्नाचा उपयोग शारीरिक तंदुरुस्ती टिकविण्यासाठी जो पूरक व्यायाम व आहार लागतो, त्यावर खर्च करण्यासाठी होतो. केवळ मी नव्हे तर लीगमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला खूप फायदा होत आहे. आमच्या सामन्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मला कौतुकाची थाप मिळते हे कौतुक आमच्यासाठी प्रेरणादायकच असते. माझे अनेक वरिष्ठ अधिकारी सामने पाहण्यासाठी येतात. त्यामुळे माझा उत्साह आणखी वाढतो.’’

इराण व दक्षिण कोरियाचे काही खेळाडू या लीगमध्ये सहभागी होत असतात. त्यांच्या कामगिरीविषयी सोनूने सांगितले, ‘‘लीगमधील अनुभवाच्या जोरावर या खेळाडूंचा दर्जा उंचावत आहे यात शंकाच नाही, मात्र आशियाई स्पर्धेत त्यांच्यापासून आमच्या विजेतेपदास कोणताही धोका नाही. कारण या खेळाडूंचेही काही कच्चे दुवे आहेत. त्याचा फायदा आम्हाला निश्चितपणे घेता येतो. या खेळाडूंचा बारकाईने अभ्यास आम्हीदेखील करीत असतो.’’

सोनीपतजवळ सोनूने कबड्डी अकादमी काढली आहे. त्याबाबत तो म्हणाला, ‘‘या खेळाने मला पैसा, प्रसिद्धी व जीवनातील स्थैर्य आदी खूप काही दिले आहे. या खेळाचे ऋण जपण्यासाठी आपणही काही केले पाहिजे या भावनेतूनच मी अकादमी सुरू केली आहे. सध्या ४० ते ५० मुला-मुलींना तेथे प्रशिक्षण दिले जात आहे. ही मुले काही वर्षांनी देशाचे प्रतिनिधित्व करतील तसेच प्रो लीगमध्ये चमक दाखवतील अशी मला खात्री आहे.’’

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 3:47 am

Web Title: interview with sonu narwal
Next Stories
1 म्युगुरुझाचे आव्हान संपुष्टात
2 कुंबळेंकडून खूप शिकता येईल -विजय
3 बंगळुरू-जयपूर लढत बरोबरीत
Just Now!
X