१८ जुलैपासून सुरू होणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या अध्यायात मैदानावरील चुरशीच्या सामन्यांदरम्यान खेळाडूंमधील आगळी ‘ठसन’सुद्धा खेळाची मजा वाढवणार आहे. पाटणा पायरेट्सचा कर्णधार राकेश कुमार आणि यु मुंबाचा इराणी खेळाडू फाझेल अत्राचाली, तेलुगू टायटन्सचा राहुल चौधरी आणि बंगळुरू बुल्सचा अजय ठाकूर, जयपूर पिंक पँथर्सचा कर्णधार नवनीत गौतम आणि यु मुंबाचा कप्तान अनुप कुमार, यु मुंबाचा सुरेंदर नाडा आणि जयपूर पिंक पँथर्सचा रोहित राणा यांच्यात ही कडवी झुंज पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.

फाझेल अत्राचाली वि. राकेश कुमार
मागील तीन आशियाई क्रीडा स्पर्धा आणि दोन विश्वचषकांमध्ये इराणने भारताला विजयासाठी झगडायला लावले. नुकत्याच इन्चॉनला झालेल्या आशियाई स्पध्रेत भारताने निसटता विजय संपादन केला होता. या पाश्र्वभूमीवर इराणचा कप्तान फाझेल अत्राचाली आणि भारताचा कर्णधार राकेश कुमार यांच्यात हेच वैर पाहायला मिळेल. प्रो कबड्डीच्या दुसऱ्या हंगामात पहिलीच लढत ही यु मुंबा आणि पाटणा यांच्यात होणार आहे.

राहुल चौधरी वि. अजय ठाकूर
तेलगू टायटन्सचा राहुल चौधरी आणि बंगळुरू बुल्सचा अजय ठाकूर हे दोघेही आपापल्या संघाचे हुकमी एक्के. राहुलने मागील हंगामात चढायांचे १२५ गुण कमावले, तर अजयने ९७ गुणांची कमाई केली. पहिल्या प्रो कबड्डी लीगमध्ये स्पध्रेतील सर्वोत्तम चढाईपटूचा पुरस्कार जिंकणाऱ्या राहुलला रोखणे प्रतिस्पर्धी संघासाठी नक्कीच आव्हानात्मक ठरेल. साखळीतील अखेरच्या सामन्यात अजयच्या संघाने फक्त एका गुणाने पराभव केल्यामुळे राहुलचा संघ बाद फेरी गाठू शकला नव्हता.

नवनीत गौतम वि. अनुप कुमार
नवनीत आणि अनुप या दोघांकडेही आंतरराष्ट्रीय खेळाचा अनुभवी गाठीशी आहे, दोघांनीही अर्जुन पुरस्कार जिंकला आहे. नवनीत क्षेत्ररक्षणात वाकबगार तर अनुप चतुरस्र चढायांनी लक्ष वेधणारा. या दोघांच्या नेतृत्वाचा कस मागील वर्षी अंतिम फेरीत लागला होता. नवनीतने संघाला विजेतेपद मिळवून देण्याची किमया साधली होती, तर अनुपने स्पध्रेतील सर्वात मौल्यवान खेळाडूचा पुरस्कार जिंकला होता. त्यामुळे एकाचे सांघिक, तर दुसऱ्याचे वैयक्तिक कर्तृत्व हे संघासाठी मोलाचे ठरले होते.

सुरेंदर नाडा वि. रोहित राणा
बेधडक खेळाची क्षमता असलेले तरुण खेळाडू ही कोणत्याही संघाची ताकद असते. जयपूरचा रोहित आणि मुंबईचा सुरेंदर यांच्यातील गुणवत्तेने पहिल्या हंगामात सर्वानाच मोहिनी घातली. दोघेही आपापल्या संघाचे महत्त्वाचे क्षेत्ररक्षक. सुरेंदरने पकडीचे ४४, तर रोहितने ३५ गुण कमवले होते. प्रो कबड्डीच्या पहिल्या हंगामात अंतिम फेरीत या दोघांनीही आपापल्या संघाला जिंकून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.