‘बीसीसीआय’च्या परिषदेत कर्णधार, प्रशिक्षकांच्या सूचना

वृत्तसंस्था, मुंबई</strong>

रणजी क्रिकेटमध्ये यापुढे पंच पुनर्आढावा पद्धत (डीआरएस) आणि नाणेफेकीचा कौल न उडवता पाहुण्या संघाला प्रथम फलंदाजी अथवा गोलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय देण्यात यावा, अशा प्रकारच्या सूचना भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) आयोजित रणजी प्रशिक्षक आणि कर्णधारांच्या परिषदेत करण्यात आल्या आहेत.

‘डीआरएस’चा वापर सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केला जात आहे. मात्र रणजी करंडक स्पर्धेच्या गेल्या मोसमात पंचांकडून बऱ्याचशा चुका झाल्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्येही या यंत्रणेचा अवलंब करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. या परिषदेदरम्यान कर्णधार आणि प्रशिक्षकांनी ही मागणी उचलून धरली. गेल्या वर्षी सौराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील उपांत्य सामन्यात मैदानावरील पंचांकडून अनेक चुका झाल्या होत्या. सौराष्ट्रचा प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा बाद असतानाही पंचांनी त्याला नाबाद ठरवले होते आणि त्याने ठोकलेले शतक सामन्याला कलाटणी देणारे ठरले होते.

नाणेफेकीची पद्धत रद्दबातल ठरवून पाहुण्या संघाला प्रथम फलंदाजी अथवा गोलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय द्यावा, या सूचनेविषयीही चर्चा करण्यात आली. तसेच दुलीप करंडक आणि इराणी करंडकाचे महत्त्व आणि समर्पकतेविषयीही चर्चा करण्यात आली.