फुटबॉलचे सम्राट म्हणून ख्याती मिळविलेले ब्राझीलचे खेळाडू एडसन अरांतेस डीनास्कीमेन्टो अर्थात पेले यांची तत्कालीन लष्करशाही राजवटीकडून चौकशी करण्यात आली होती.
साओ पाओलो राज्य शासनाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. शासनाने तीन लाखपेक्षा जास्त जुन्या फायली प्रकाशित केल्या असून त्यामध्ये पेले यांची १९६४ ते १९८५ या कालावधीत चौकशी करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. ब्राझीलमध्ये त्या वेळी डाव्या विचारवंतांची सत्ता होती व पेले यांचा या विचारांच्या सत्ताधाऱ्यांशी मतभेद झाले होते. त्यामुळेच त्यांची चौकशी करण्यात आली होती.
पेले यांच्या घरावर डाव्या विचारसरणीच्या लोकांनी हल्लेही केले होते व त्यांच्या मालमत्तेचे नुकसानही केले होते. त्याबाबत वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांचाही तपशील पेले यांच्या नावाचे फायलीत दिसून आला आहे. पेले यांनी १९५८, १९६२ व १९७० मध्ये ब्राझील संघास विश्वविजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्यांनी कारकीर्दीत १२८१ गोल करीत हजार गोलांचा सम्राट हा किताबही मिळविला होता.