पाकिस्तान क्रिकेट संघाच्या निवड समिती अध्यक्षपदी माजी कर्णधार इंझमाम उल हकची निवड करण्यात आली आहे. इंझमाम हा सध्याच्या घडीला अफगाणिस्तानच्या संघाशी करारबद्ध आहे. पण त्याला या करारातून लवकर मुक्त करावे, अशी विनंती पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) अफगाणिस्तानच्या क्रिकेट मंडळाला केली आहे.
इंझमामकडे पहिल्यांदाच निवड समितीमधील पद सोपवण्यात आले आहे. यापूर्वी २०१२-१३ साली इंझमामला संघाच्या फलंदाजी सल्लागारपदी नेमले होते. इंझमामची निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असली तरी तो किती कालावधीसाठी हे पद सांभारणार आहे, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. निवड समितीमध्ये इंझमामसह तौसिफ अहमद, वाजातुल्लाह वास्ती आणि वसिम हैदर या माजी क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे.
‘पाकिस्तानकडून मी बरेच सामने खेळलो आहे, पण पहिल्यांदाच मला निवड समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे. पीसीबीने माझ्यावर फार मोठी जबाबदारी सोपवली आहे,’ असे इंझमाम म्हणाला.
पाकिस्तानचा संघ फार कठीण काळातून जात असताना इंझमामची निवड करण्यात आली आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकात पाकिस्तानला चांगली कामगिरी करता आली नाही. कर्णधार शाहिद आफ्रिदीने राजीनामा दिला आहे, तर माजी क्रिकेटपटू वकार युनूस यांनी प्रशिक्षकपदाचा त्याग केला आहे. पदाचा त्याग करण्यापूर्वी वकार यांनी निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी इंझमामचे नाव सुचवले होते. पाकिस्तानचा संघ जुलै महिन्यामध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात चार कसोटी, पाच एकदिवसीय आणि एकमेव ट्वेन्टी-२० सामना खेळवण्यात येणार आहे.
‘मी निवड समितीवर आल्यावर फार लवकर बदल घडतील, असे नाही. त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागले. गेल्या निवड समितीने नेमके काय केले, यावर मी भाष्य करणार नाही. सर्वोत्तम संघ निवडण्याकडे कल असेल,’ असे इंझमाम म्हणाला.