धर्माच्या आधारावर पाकिस्तानी संघात भेदभाव झाल्याचा दानिश कनेरियाचा दावा इंझमाम उल हकने फेटाळून लावला आहे. इंझमाम उल हक पाकिस्तानचा माजी कर्णधार आहे. त्याने अनेक वर्ष पाकिस्तानी संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. दानिश कनेरिया हा पाकिस्तानी संघातून खेळलेला हिंदू क्रिकेटपटू आहे.

दानिश कनेरिया इन्झमामच्याच नेतृत्वाखाली जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. पाकिस्तानच्या या माजी कर्णधाराने त्याच्या ‘इंझमाम उल हक- द मॅच विनर’ या युटयूब चॅनलवरुन दानिश कनेरियाचे सर्व आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी संघातचं नव्हे तर, शेजारच्या भारतीय संघातही कसा धार्मिक सलोखा आहे ते उदहारणासह पटवून देण्याचा प्रयत्न केला.

इंझमाम काय म्हणाला?

दानिश कनेरियावरुन सुरु असलेल्या वादाबद्दल मला समजले आहे. “जेव्हा तो पाकिस्तानी संघामध्ये होता, तेव्हा संघातील काही सदस्यांना त्याच्यासोबत जेवण करायची इच्छा नव्हती तसेच त्याच्यासोबत बाहेर जाणे टाळायचे.” हे आरोप मी ऐकले आहेत. “माझ्याच नेतृत्वाखाली दानिश पाकिस्तानसाठी सर्वाधिक क्रिकेट खेळला आहे. त्यावेळी संघात असे काही वातावरण होते असे मला अजिबात वाटत नाही. धर्मावरुन एका खेळाडूने दुसऱ्या खेळाडूला वाईट वागणूक दिली नाही. संघात अशी एकही घटना माझ्या पाहण्यात आलेली नाही” असे इंझमामने  म्हटले आहे.

इंझमामने  यासाठी युसूफ योहानाचे उदहारण दिले. तो त्यावेळी मुस्लीम नव्हता. पुढे अल्लाच्या कृपेने तो मोहम्मद युसूफ झाला. धर्म परिवर्तन करण्याआधी युसूफ योहाना म्हणून संघात असताना त्याला कधीही भेदभाव होत असल्याची जाणीव झाली नाही. आम्ही इतक्या छोटया मनाचे नाहीत. पाकिस्तान्यांची मने खूप मोठी आहेत. आम्ही मनापासून स्वीकार करतो.” असे इंझमामने म्हटले आहे.