18 November 2017

News Flash

बंदी झुगारून आयओएच्या निवडणुका झाल्याच!

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) बंदी घातलेल्या भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षपदासाठी अभयसिंग चौताला यांच्या निवडीवर

पी.टी.आय. नवी दिल्ली | Updated: December 6, 2012 5:41 AM

चौताला अध्यक्ष तर भानोत सरचिटणीस

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) बंदी घातलेल्या भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षपदासाठी अभयसिंग चौताला यांच्या निवडीवर बुधवारी येथे शिक्कामोर्तब झाले तर सरचिटणीसपदी ललित भानोत यांची निवड झाली आहे. या दोन्ही उमेदवारांच्या प्रतिस्पध्र्यानी यापूर्वीच माघार घेतल्यामुळे त्यांची निवड यापूर्वीच निश्चित झाली होती.
उच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत ही निवडणूक घेण्यात आली. आयओसीने आयओएला निवडणुका घेऊ नयेत असा आदेश दिला असतानाही आयओएने या आदेशाला न जुमानता निवडणुका घेतल्या. निवडणुकांचे समर्थन करताना चौताला म्हणाले, ‘‘उच्च न्यायालयाने आम्हास निवडणुका घेण्याचे आदेश दिले असल्यामुळे आम्हाला निवडणुक घेणे बंधनकारक होते. आम्ही आयओसीकडे आमची बाजू मांडणार आहोत. आम्ही कोणतेही बेकायदेशीर कृत्य केलेले नाही. न्यायालय आम्ही सर्वोच्च मानतो आणि त्यांच्या आदेशानुसार निकोप वातावरणात या निवडणुका झाल्या आहेत.’’
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी भानोत यांना नऊ महिने तुरुंगवास सहन करावा लागला होता. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली असून हा खटला सध्या सुरू आहे. त्याबाबत भानोत यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘मी जर दोषी ठरलो तर लगेचच माझ्या पदाचा राजीनामा देईन. आयओएवर खेळाडूंना अधिक प्रतिनिधित्व असावे यासाठी आम्ही पी.टी.उषा, दिलीप तिर्की व पुल्लेला गोपीचंद या ज्येष्ठ ऑलिम्पिकपटूंची त्रिसदस्य समिती नियुक्त केली आहे.’’
तत्पूर्वी, आयओएचे प्रभारी अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा यांनी सभा झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘निवडणूक प्रक्रियेत आम्ही काहीही गैर केलेले नाही अशा आशयाचा ठराव आजच्या सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार क्रीडा नियमावलीच्या तरतुदींप्रमाणे निवडणुका घेणे आम्हास बंधनकारक होते. ही गोष्ट आम्ही यापूर्वीच आयओसीला कळविली होती. तरीही आयओसीने आमच्यावर बंदीची कारवाई केली आहे. या सभेस विविध खेळांच्या महासंघांचे ८५ टक्के प्रतिनिधी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, ‘‘बंदीच्या कारवाईबाबत मध्यस्थी करण्याची विनंती आम्ही पंतप्रधानांनाही कळविली आहे. त्यामुळे या प्रकरणी लवकरच तोडगा निघेल अशी आशा आहे. आयओसी, आयओए व केंद्र शासनाच्या प्रतिनिधींमध्ये लवकरच चर्चा होणार आहे. आयओसीची नियमावली, क्रीडा मसुदा व उच्च न्यायालयाच्या तरतुदींबाबत एकच समान तोडगा काढण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.’’
राष्ट्रकुल स्पर्धेच्या गैरव्यवहाराचे आरोप असलेले ललित भानोत हे आयओएचे सरचिटणीस झाले आहेत. त्यासंदर्भात मत व्यक्त करण्यास मल्होत्रा यांनी नकार दिला. ते म्हणाले, याबाबत भानोत हेच सविस्तर खुलासा करू शकतील.  बंदीच्या कारवाईविरुद्ध आंतरराष्ट्रीय लवादापुढे अपील करण्याचा सध्या तरी विचार नसल्याचे आयओएकडून सांगण्यात आले.
आयओएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, आयओसी किंवा शासनाबरोबर आमचे कोणतेही मतभेद नाहीत. शासन व आयओसी यांच्यातच मतभेद आहेत. आम्ही आयओसीच्या प्रतिनिधींची लवकरच भेट घेणार आहोत. त्यावेळी केंद्र शासनाचेही प्रतिनिधी असतील. बंदीची कारवाई झाली असली तरी सोसायटीच्या कायद्यानुसार आमची संस्था नोंदणीकृत संस्था असल्यामुळे नियमानुसार वार्षिक सभा घेणे बंधनकारक आहे. सध्याच्या कार्यकारिणीची मुदत ऑक्टोबरमध्ये संपली आहे. त्यामुळे भारतीय कायद्यानुसार निवडणुका घेणे अनिवार्य होते. कोपनहेगन येथे २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची जागतिक परिषद आयोजित करण्यात आली होती. संलग्न ऑलिम्पिक संघटनांनी त्यांच्या देशातील कायद्यानुसार कारभार व व्यवस्थापन करावे असा ठरावही मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे निवडणुका घेणे हे काही बेकायदेशीर कृत्य होऊ शकत नाही.
बंदीची कारवाई किती दिवस राहील असे विचारले असता या अधिकाऱ्याने सांगितले, बंदी मागे घेण्याचा निर्णय कार्यकारिणीत किंवा वार्षिक सभेत घेतला जातो. वर्षांतून आयओसीच्या कार्यकारिणीची चार वेळा बैठक आयोजित केली जाते. पुढची बैठक फेब्रुवारीत आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत बंदीची कारवाई मागे घेतली जाईल अशी आशा आहे. आयओएच्या सध्याच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधी गटातील रणधीरसिंग किंवा त्यांचे पाठिराखे आज येथे झालेल्या आयओएच्या सभेस उपस्थित नव्हते.     

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची कार्यकारिणी
अध्यक्ष : अभयसिंग चौताला
सरचिटणीस : ललित भानोत
वरिष्ठ उपाध्यक्ष : वीरेंद्र नानावटी
खजिनदार : एन रामचंद्रन
उपाध्यक्ष : अखिलेश दास गुप्ता, बी.पी.वैश्य, परमिंदर सिंग धिंडसा, अनुराग ठाकूर, आर.के.आनंद, तारलोचन सिंग, नरिंदर बात्रा, जी.एस. मंदेर.
संयुक्त सचिव : आनंदेश्वर पांडे, राजा. के. सिधू, राकेश गुप्ता, कुलदीप वत्स, राजीव मेहता, एस. एच. हाश्मी.
कार्यकारिणी समिती सदस्य : आय.डी. नानावटी, बी. एस. लांगडे, ब्रीजभूषण सरन, धनराज चौधरी, मोहम्मद मुश्ताक अहमद, अधिप दास, राजेश भंडारी, सुरेश शर्मा, बलबीर सिंग खुशवाह, भूपिंदर सिंग बाजवा, अशोक सहोता, कर्नल एन कुमार, पी.के.प्रधान , वागिश पाठक, आर.के.गुप्ता, नामदेव शिरगावकर, सहदेव यादव, वी.ए. सियाद, राना गुरमीत सोधी, व्ही.एस. सिसोदिया.

First Published on December 6, 2012 5:41 am

Web Title: ioa complete the election process inspite ban
टॅग Ban,Election,Ioa,Sports