नवी दिल्ली : करोनामुळे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी २०० कोटींपेक्षा अधिक एकरकमी अनुदान द्या, अशी मागणी भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून (आयओए) क्रीडा मंत्रालयाला करण्यात आली आहे. ‘आयओए’चे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना पाठवलेल्या पत्रात ही मागणी केली आहे. किमान वर्षभर तरी क्रीडा स्पर्धाकडे प्रायोजक पाठ फिरवतील त्यामुळे ही मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. ‘‘आयओएसाठी १० कोटी अनुदान द्यावे. ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांच्या राष्ट्रीय महासंघांसाठी प्रत्येकी पाच कोटी, ऑलिम्पिक वगळता अन्य खेळांतील क्रीडा संघटनांसाठी अडीच कोटी आणि राज्य ऑलिम्पिक संघटनांसाठी प्रत्येकी एक कोटी रुपये अनुदानाची मागणी आहे. करोनामुळे या सर्व क्रीडा संघटनांना मोठी आर्थिक अडचण आहे. जर क्रीडा स्पर्धाच्या सरावाला सुरुवात करायची असेल तर या आर्थिक मदतीची गरज आहे. करोनामुळे जग आर्थिक संकटात असताना प्रायोजकही क्रीडा क्षेत्राकडे पाठ फिरवतील,’’ असे बात्रा यांनी म्हटले.