देशाने अतिशय कुशल संघटक व प्रशिक्षक गमावला आहे अशा शब्दांत भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) महासंघाचे माजी अध्यक्ष विद्याचरण शुक्ला यांना श्रद्धांजली वाहिली. शुक्ला यांचे गुरगाव येथे मंगळवारी निधन झाले.
शुक्ला यांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे हाताळली होती तसेच ते १९८४ ते १९८७ या कालावधीत आयओएचे अध्यक्ष होते.
शुक्ला यांना श्रद्धांजली वाहताना आयओएने पत्रकात म्हटले आहे, शुक्ला हे अतिशय सक्षम क्रीडा संघटक होते व देशाच्या क्रीडा विकासात त्यांचा मोठा वाटा होता. कुस्तीबरोबरच अन्य क्रीडा प्रकारांच्या विकासाकरिता त्यांनी अनेक विविध योजना अमलात आणल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे देशाच्या क्रीडा क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.
आयओएचे पदच्युत अध्यक्ष अभयसिंह चौताला व सरचिटणीस ललित भानोत यांनी शुक्ला यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे, आमच्यासाठी ते आदर्श प्रशिक्षक व प्रवर्तक होते. क्रीडा क्षेत्रातील ते पितामह होते. त्यांची उणीव आम्हाला सतत होणार आहे. महासंघाचे माजी अध्यक्ष डॉ. बी. शिवांथी आदित्यन यांचे एप्रिलमध्ये निधन झाले होते. त्यांच्या निधनाच्या धक्क्य़ातून आम्ही सावरत नाही तोच आम्हाला शुक्ला यांच्या निधनाचे वृत्त ऐकावयास लागले आहे. क्रीडा क्षेत्रासाठी ही अतिशय धक्कादायक घटना आहे. आयओएवरील बंदीबाबत शुक्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. देशातील क्रीडा क्षेत्राची भरभराट व्हावी असे सतत त्यांना वाटत असे. आयओएचे प्रभारी अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा यांनी शुक्ला यांच्या कार्याचा उल्लेख करीत सांगितले, शुक्ला यांच्या निधनामुळे देशाच्या क्रीडा क्षेत्राचे अपरिमित नुकसान झाले आहे. ते माझे जिवलग मित्र होते आणि मार्गदर्शकही होते. महासंघावर काम करताना त्यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचा मला खूप फायदा झाला होता. राजकारण हा शुक्ला यांचा पिंड असला तरी खेळाडूंच्या विकासाकरिता कधीही त्यांनी राजकारण केले नाही.