क्रीडा मंत्रालयाने आखलेल्या TOPS योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याच्या कारणावरुन, बिजींग ऑलिम्पीक सुवर्णपदक विजेता नेमबाजपटू अभिनव बिंद्राने काही दिवसांपूर्वी आपली नाराजी व्यक्त केली. अभिनव बिंद्रा याच्या अध्यक्षतेखालील प्रकाश पदुकोण, कर्नम मल्लेश्वरी, पी. टी. उषा यांनी क्रीडा मंत्रालयाला, TOPS योजनेची योग्य पद्धतीने अंमलबजावणी न झाल्यास भारतावर रिओ ऑलिम्पिकसारखी नामुष्की परत ओढावू शकते असा गंभीर इशारा दिला होता.

अवश्य वाचा – …तर भारतावर रिओ ऑलिम्पिकसारखी नामुष्की पुन्हा ओढावेल, बिंद्रा समितीचा क्रीडा मंत्रालयाला इशारा

या घडामोडींनंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे प्रमुख नरेंद्र बत्रा यांनी TOPS योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी घेतली आहे. “अभिनव बिंद्रा यांच्या समितीने नोंदवलेल्या निरीक्षणांची मी दखल घेतली आहे. या योजनेची अधिक चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी होण्यासाठी मी स्वतः क्रीडामंत्र्यांशी याबद्दल चर्चा करणार आहे.” खेळाडूंना ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये योग्य मदत मिळण्यासाठी ही योजना लवकरात लवकर लागू करणं गरजेचं असल्याचंही बत्रा म्हणाले.

ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासोबत नरेंद्र बत्रांकडे आंतरराष्ट्रीय हॉकी परिषदेच्या अध्यक्षपदाचीही जबाबदारी आहे. ज्या राष्ट्रीय क्रीडा संस्थानी आधुनिक पद्धतीने खेळाडूंना सुविधा उपलब्ध करुन दिल्या, त्या खेळांना त्याचा नक्कीच फायदा झालेला आहे. गेल्या काही वर्षांमधे भारतीय हॉकी संघाच्या कामगिरीत झालेली सुधारणा हे याचच उदाहरण असल्याचं बत्रा म्हणाले. ऑलिम्पिक टू ऑलिम्पिक या सायकलमध्ये खेळाडूंना योग्य आर्थिक मदत, अनुभवी प्रशिक्षकांचं मार्गदर्शन आणि पौष्टीक आहार मिळणं गरजेचं आहे. यासाठी सर्व क्रीडा संघटनांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करणं गरजेचं असल्याचं मत नरेंद्र बत्रा यांनी व्यक्त केलं.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा अध्यक्ष या नात्याने, आगामी २०२० आणि २०२४ ऑलिम्पिकमध्ये भारताची कामगिरी सुधारावी याकडे माझा पहिला कल असणार आहे. मात्र जर आपल्याला महत्वाच्या स्पर्धांमध्ये चांगले निकाल येणं अपेक्षित असेल, तर क्रीडा मंत्रालय आणि सर्व खेळांच्या संघटनांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं असल्याचं, बत्रा म्हणाले.