भारताची उदयोन्मुख अ‍ॅथलेट द्युती चंदच्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील सहभागाबाबत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीबरोबर (आयओसी) चर्चा केल्यानंतरच निर्णय घेण्यात येणार आहे, असे आंतरराष्ट्रीय हौशी अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (आयएएएफ) कळविले आहे.
द्युतीच्या शरीरात प्रमाणापेक्षा जास्त संप्रेरके आढळल्यानंतर गतवर्षी भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने आंतरराष्ट्रीय नियमानुसार द्युतीला अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भाग घेण्यास मनाई केली. तिच्यावर दोन वर्षांकरिता बंदी घातली गेली. या निर्णयाविरुद्ध आव्हान देणारी याचिका द्युतीने क्रीडा अपील समितीकडे (सीएएस) दिली होती व आपल्याला स्पर्धेत भाग घेण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती. त्यानुसार या समितीने आयएएएफच्या नियमावलीच्या कालमर्यादेस आव्हान दिले असून द्युतीला स्पर्धामध्ये भाग घेण्यास परवानगी द्यावी, असा निर्णय घेतला आहे.
आयएएएफने तिच्या प्रकरणावर निर्णय न घेता आयओसीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे ठरविले. सीएएसने घेतलेल्या आक्षेपांना कशा पद्धतीने उत्तर द्यायचे व द्युतीबाबत काय निर्णय घेता येईल, या संदर्भात आयओसीकडे आयएएएफने विचारणा केली आहे.