भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनवर (आयओए) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) घातलेली बंदी १४ महिन्यांनंतर उठली. बंदीचे हे ग्रहण सुटले, म्हणजे आता सर्व काही आलबेल असणार आहे, असा समज आपल्या संघटकांनी करून घेतला असेल तर तो त्यांचा गैरसमज असणार आहे. कारण आयओएसमोरच्या समस्यांचा विचार करता यापुढचा काळच खरा कसोटीचा ठरणार आहे.
आयओएच्या २०१२मध्ये निवडणुका झाल्या होत्या. मात्र या निवडणुका पारदर्शी झाल्या नाहीत. त्यामध्ये अनेक गैरव्यवहार झाले. निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांची पाश्र्वभूमी अस्वच्छ प्रतिमेची होती. ऑलिम्पिक चळवळीच्या नियमावलींचे पालन केले गेले नाही आदी विविध कारणे पुढे करीत आयओसीने आयओएवर बंदी घातली. ही बंदी उठविण्यासाठी त्यांनी अनेक अटी घातल्या होत्या. भ्रष्टाचार व अन्य गुन्ह्य़ांसारखे आरोप असलेल्या संघटकांना आयओएचे सभासद व पदाधिकारी होता येणार नाही, अशी घटनादुरुस्ती करण्याची मुख्य अट त्यांनी घातली होती. साहजिकच २०१२च्या निवडणुकीत निवडून आलेले अभयसिंह चौताला, ललित भानोत यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना आयओएपासून दूर व्हावे लागणार होते. सुरुवातीला घटनादुरुस्तीला या पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या पाठिराख्यांनी विरोध दर्शविला होता. मात्र आयओसीने घटनादुरुस्ती करा, अन्यथा कायमस्वरूपी बंदी स्वीकारण्याची तयारी ठेवा, असा सज्जड इशारा दिल्यानंतर नाइलाजास्तव घटनादुरुस्ती करावी लागली. या दुरुस्तीनंतर लगेच निवडणुकाही घेण्यात आल्या व बंदीची नामुष्की मागे घेण्यात आली.
आयओएच्या अध्यक्षपदी एकमताने निवडून आलेले एन.रामचंद्रन हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांचे बंधू आहेत. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन तसेच चेन्नई सुपर किंग्जवर न्यायालयाने मॅच-फिक्सिंगचे आरोप ठेवले आहेत. त्यामुळे श्रीनिवासन यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दडपण आणले जात आहेत.
पारदर्शी पद्धतीने आयओएच्या निवडणुका झाल्या असल्या तरी आयओएच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांना काम करणे सोपे नाही. चौताला व भानोत ही मंडळी म्हणजे झारीतील शुक्राचार्य आहेत. आयओएपासून दूर झाल्यावर ही मंडळी स्वस्थ बसणार नाहीत. आयओएच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध त्यांना स्वत:हून थेट काही करता आले नाही तरी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक  ठेवून लक्ष्य साध्य करण्यात ते चतूर आहेत. येनेकेनप्रकारेण पदाधिकाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी ते उद्योग करणार आहेत, याची आयओएला गांभीर्याने दखल घ्यावी लागणार आहे.
बॉक्सिंगच्या राष्ट्रीय संघटनेवर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने घातलेली बंदी अद्याप उठलेली नाही. अन्य काही खेळांच्या राष्ट्रीय संघटनाही कायदेशीर अडचणीत आहेत. हॉकीमध्ये ‘हॉकी इंडिया’ या अधिकृत राष्ट्रीय संघटनेविरुद्ध भारतीय हॉकी महासंघ (आयएचएफ) सतत काही ना, काही तरी कुरापती काढत असते. अनेक खेळांमध्ये दोन-दोन, तीन-तीन संघटना कार्यरत आहेत. एक खेळ एक संघटना हे तत्त्व केव्हाच मोडीत निघाले आहे. त्यामुळे गुणवान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय कारकीर्द करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असते. मात्र त्याची पर्वा या संघटकांना कधीच नसते. आपली खुर्ची कशी टिकेल, यावरच ते प्राधान्य देत असतात.
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने क्रीडा धोरणाचा मसुदा तयार केला आहे. संघटनेवरील पदाधिकाऱ्यांकरिता वयोमर्यादा तसेच कालमर्यादा घालाव
, हा प्रामुख्याने मुद्दा घालण्यात आला आहे. अनेक खेळांच्या राष्ट्रीय संघटनांवर विद्यमान केंद्रीय मंत्र्यांसह अनेक राजकीय नेते अध्यक्षपद भूषवत आहेत. गेली अनेक वर्षे ते खेळाच्या संघटनेची सत्ता उपभोगत आहेत. नवीन क्रीडा धोरणामुळे त्यांच्या सत्तेवर गदा येणार आहे. ही मंडळी सत्तेवर असल्यामुळे अनेक ठिकाणी पारदर्शी निर्णय घेतले जाऊ शकत नाहीत व पर्यायाने खेळाडूंचे व खेळाचे नुकसान होत असते. नवीन क्रीडा मसुदा राबविण्यासाठी आयओएने पुढाकार घेतला पाहिजे.
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये आपले अनेक खेळाडू उत्तेजक औषधे सेवनप्रकरणी दोषी आढळले जातात. त्यामुळे त्यांची क्रीडा कारकीर्दच संपुष्टात येते. दुर्दैवाने आपल्या देशात जागतिक दर्जाची अद्ययावत उत्तेजक चाचणी प्रयोगशाळा नाही. देशात प्रमुख ठिकाणी अशा प्रयोगशाळा तयार करण्याची आवश्यकता आहे. शालेय स्तरावरील स्पर्धामध्येही उत्तेजक औषधे सेवन प्रकरणाच्या घटना आढळून येत आहेत. त्यामुळे खेळाची प्रतिमा मलिन होत असते.
वयाचे खोटे दाखले देण्याच्या घटना आपल्या देशात अनेक स्पर्धामध्ये पाहावयास मिळतात. ज्या वयात कारकीर्दीची सुरुवात होत असते अशाच वयात खेळाडूंना वयाचे खोटे दाखले देण्यासाठी पालक व प्रशिक्षक प्रवृत्त करीत असतात. केव्हा ना केव्हातरी त्यांचा खोटेपणा उघडकीस येतो व कारकीर्द बहरत असताना या खेळाडूंचे क्रीडाजीवनच उद्ध्वस्त होत असते. उत्तेजकाइतकीच ही समस्याही अतिशय गंभीर आहे. या सर्वच समस्यांवर मात करण्यासाठी प्रशिक्षकांनाच योग्य रीतीने मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
भारतीय खेळाडूंसाठी यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धा व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणजे २०१६मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वीची रंगीत तालीम आहे. या स्पर्धामधील कामगिरीच्या आधारे ऑलिम्पिकसाठी संघबांधणी करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. त्याचा उपयोग योग्य रीतीने करण्यासाठी आयओएने प्रयत्न केले पाहिजेत. ऑलिम्पिकसाठी संभाव्य पात्र व योग्य खेळाडूंची पारदर्शी प्रक्रियेद्वारे निवड करून त्यांना दीर्घकालीन प्रशिक्षण व स्पर्धात्मक सरावाची संधी दिली पाहिजे. ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाला अधिकाधिक पदके कशी मिळतील, हेच आयओएच्या नवीन पदाधिकाऱ्यांपुढील मुख्य लक्ष्य असेल व ते साध्य करणे हीच आयओएपुढील कसोटी असणार आहे.