News Flash

ऑलिम्पिक आयोजनाबाबत ‘आयओसी’ आशावादी!

जपानमधील प्रसारमाध्यमांकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार ७० टक्के नागरिक ऑलिम्पिकच्या विरोधात आहेत.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जपानसह अन्य देशांतील नागरिकांनी केलेल्या सार्वजनिक विरोधानंतरही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाबाबत आशावादी आहे. गेल्या दोन आठवड्यांमध्ये झालेल्या चाचणी स्पर्धांच्या यशस्वी आयोजनाच्या बळावर ‘आयओसी’ने बुधवारी ऑनलाइन बैठकीत खेळाडूंना आणि संयोजकांना अधिक जोमाने ऑलिम्पिकच्या तयारीला लागण्याचे सुचवले आहे.

जपानमधील प्रसारमाध्यमांकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार ७० टक्के नागरिक ऑलिम्पिकच्या विरोधात आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी जमावाकडून निदर्शने बुधवारीही सुरू होती. परंतु ‘आयओसी’ मात्र स्पर्धेच्या आयोजनाबाबत ठाम आहे. ‘‘टोक्यो ऑलिम्पिकसाठी आता अवघे ७८ दिवस शिल्लक आहेत. जपानसह जगभरातील सद्यस्थिती काय आहे, याची आम्हाला जाणीव आहे.  परंतु स्पर्धेच्या आयोजनावर या गोष्टींचा प्रभाव पडणार नाही. त्याउलट प्रत्यक्षात स्पर्धेला प्रारंभ झाल्यावर आपसुकच विरोधकांचेही चाहत्यांत रुपांतर होईल,’’ असे ‘आयओसी’चे प्रवक्ते मार्क अ‍ॅडम्स यांनी सांगितले. गेल्या रविवारी टोक्यो येथील राष्ट्रीय स्टेडियममध्ये अ‍ॅथलेटिक्सची चाचणी स्पर्धा झाली.

विदेशी क्रीडापटूंना मनाई

टोक्योमध्ये विविध ठिकाणच्या स्थानिक आयोजकांकडून विदेशी क्रीडापटूंना चाचणी स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास विरोध दर्शवला जात आहे. करोनाचा धोका वाढत असल्यामुळे विदेशी खेळाडूंना थेट मुख्य स्पर्धेत खेळवावे. जेणेकरून स्थानिक भागातील रहिवाशी तसेच जपानच्या खेळाडूंना कोणताही धोका उद्भवणार नाही, अशी मागणी या ठिकाणच्या आयोजकांकडून केली जात आहे. ब्रिटनचा बास्केटबॉल संघ आणि रशियाच्या तलवारबाजी संघाला बुधवारी चाचणी स्पर्धांमध्ये सहभागी होण्यापासून रोखण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 1:29 am

Web Title: ioc optimistic about olympics akp 94
Next Stories
1 करोनानंतरही ऑलिम्पिकपटूंचा मार्ग मोकळा!
2 माजी टेबल टेनिसपटू चंद्रशेखर यांचे करोनामुळे निधन
3 सायना, श्रीकांतचा ऑलिम्पिक स्वप्नभंग?
Just Now!
X