पुलवामा अतिरेकी हल्ल्यात 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागल्यामुळे, भारताने सर्व पातळीवर पाकची कोंडी करायला सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणून नवी दिल्लीत आजपासून सुरु होत असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानच्या दोन नेमबाजपटूंना व्हिसा नाकारत पाकला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताची ही चाल चांगलीच अंगलट आली आहे. पाकिस्तानच्या शिष्टमंडळाने तक्रार केल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भविष्यात भारतामध्ये कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली जाणार नाही असं म्हटलं आहे.

याचसोबत विश्वचषकात 25 मी. रॅपिड फायर पिस्तुल स्पर्धेसाठी देण्यात आलेला ऑलिम्पिक कोटाही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने काढून घेतला आहे. जोपर्यंत भारत सरकार स्पर्धेत सहभागी असलेल्या प्रत्येक देशाच्या खेळाडूला प्रवेश देण्याबद्दल आणि ऑलिम्पिक समितीच्या नियमांचं पालन करण्याबाबत लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नसल्याचं ऑलिम्पिक समितीने स्पष्ट केलंय. व्हिसा नाकारल्यानंतर पाकिस्तानी नेमबाजी संघटनेने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे तक्रार केली होती. यावर कारवाई करताना स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक देशाच्या खेळाडूच्या हिताच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचं ऑलिम्पिक समितीने स्पष्ट केलं आहे.