यंदाच्या आयपीएलमध्ये जेमतेम कामगिरी राहिलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने आज गतविजेत्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात उत्तम सांघिक कामगिरी करत विजय प्राप्त केला. हैदराबादने दिलेलं १८६ धावांचं आव्हान दिल्लीने पाच विकेट्स राखून गाठलं. दिल्लीकडून कोरी अँडरसनने नाबाद ४१ धावांची मॅच विनिंग खेळी साकारली, तर ख्रिस मॉरीसने(१५*) त्याला उत्तम साथ दिली. झहीर खानच्या अनुपस्थितीत करुण नायरने दिल्लीच्या संघाचे नेतृत्त्व केले. नायरने सलामीला आश्वासक फलंदाजी करून पाया रचला. त्याला यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतनेही(३४) चांगली साथ दिली. नायरने २० चेंडूत ३९ धावा केल्या. अखेरीस अँडरसनने धुरा सांभाळून विजयाचा कळस चढवला.

तत्पूर्वी, हैदराबादकडून युवराज सिंगने ४१ चेंडूत नाबाद ७० धावांची खेळी साकारून संघाला १८६ धावांपर्यंत पोहोचवले. दिल्लीच्या संघात पुनरागमन केलेल्या मोहम्मद शमीने डेव्हिड वॉर्नरचा काटा काढला. शमीने आपल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर वॉर्नरला क्लीनबोल्ड केले. धवनला(२८) सुर गवसत असताना अमित मिश्राने त्याची विकेट घेतली. युवराजने यावेळी संघाचा डाव सावरत संयमी सुरूवात केली. अखेरीस आपल्या पोतडीतील नजाकती फटक्यांना नमुना पेश करत युवीने चांगल्या धावा वसुल केल्या. युवीने तब्बल ११ चौकार ठोकले, तर एक उत्तुंग षटकार लगावला.  युवीला हेन्रीकसने चांगली साथ दिली. त्याने १८ चेंडूत नाबाद २५ धावा केल्या.