News Flash

IPL 2017 , MI vs RCB : मुंबईचा ‘रॉयल’ विजय, रोहितकडून कोहलीचे ‘पॅकअप’

प्रत्युत्तरात, मुंबईला पहिल्याच चेंडूवर पार्थिव पटेलच्या रुपात धक्का बसला होता.

Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore

मुंबई इंडियन्सने आपला विजयरथ कायम ठेवत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या उरल्यासुरल्या आशा देखील संपुष्टात आणल्या. वानखेडेवर झालेल्या सामन्यात रोहित शर्माच्या नाबाद ५६ धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने बेंगळुरूवर ५ विकेट्सने दणदणीत विजय साजरा केला. स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीमुळे बेंगळुरूचे बाद फेरीच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. कारण बेंगळुरूने खेळलेल्या ११ सामन्यांमध्ये केवळ पाच गुण संघाच्या खात्यात जमा आहेत. तर १६ गुणांसह मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत आता अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. खरंतर आजच्या सामन्याची नाणेफेक बेंगळुरूने जिंकली होती. वानखेडेवर धावांचा पाठलाग सहजशक्य असल्याचा इतिहास असला तरी कोहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

फलंदाजीत पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची कामगिरी ‘जैसे थे’ असल्याचे पाहायला मिळाले. बेंगळुरूला वीस षटकांमध्ये केवळ १६२ धावांपर्यंतच मजल मारता आली. धडाकेबाज फलंदाजांचा समावेश असूनही बेंगळुरूला मानहानीकारक पराभवांना सामोरे जावे लागले. आजही संघातील मातब्बर खेळाडूंकडून निराशाजनक कामगिरीच पाहायला मिळाली. डी’व्हिलियर्सच्या २७ चेंडूतील ४७ धावा वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.  कोहलीने चांगली सुरुवात केली होती, पण तोही मोठा फटका मारताना झेलबाद झाला. कोहलीने केवळ २० धावा केल्या. १०४ धावांतच बेंगळुरूचा निम्मा संघ तंबूत दाखल झाला होता. पुढे पवन नेगी आणि केदार जाधव यांनी फटकेबाजी करून संघाला समाधानकारक आकडा गाठून दिला. पवन नेगीने २३ चेंडूत ३५ धावांची खेळी केली, तर जाधवने २८ धावांचे योगदान दिले.

प्रत्युत्तरात, मुंबईला पहिल्याच चेंडूवर पार्थिव पटेलच्या रुपात धक्का बसला होता. बेंगळुरूने चांगली सुरूवात केली, पण रोहित शर्माने यावेळी कर्णधारी खेळी साकारून बेंगळुरूच्या मनसुब्यांना सुरूंग लावला. शर्मासह यावेळी जोस बटलरने २१ चेंडूत ३३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. तर नितीश राणाने २७ धावांचे योगदान दिले. कुणाल पंड्याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले असताना रोहितने संघाच्या धावसंख्येला सावरून संघाला विजयापर्यंत नेले. मुंबईने या विजयासह बाद फेरीतील दावेदारी सिद्ध करून दाखवली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 3:00 am

Web Title: ipl 10 live cricket score mumbai indians vs royal challengers bangalore mi vs rcb match updates t20 score wankhede stadium
Next Stories
1 अझलन शाह हॉकी स्पर्धा : भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी
2 चॅम्पियन्स लीग फुटबॉल : नवा डाव, जुने प्रतिस्पर्धी!
3 व्यग्र वेळापत्रकामुळे युनायटेडची पिछेहाट
Just Now!
X