खेळाडूंच्या लिलावात सर्वात महागडा ठरलेला बेन स्टोक्सने यावेळी आपली निवड सार्थ ठरवत संघासाठी नाबाद शतकी खेळी साकारून विजयी कामगिरी केली. गुजरात लायन्सने दिलेल्या १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पुण्याचे फलंदाज एकामागोमाग एक बाद होत असताना स्टोक्सने मैदानात टीच्चून फलंदाजी करत झुंजार शतक ठोकले. अखेरच्या षटकात पायाला दुखापत होऊनही स्टोक्सने संघासाठी विजयी धाव घेत नाही तोवर हार मानली नाही. स्टोक्सने केवळ ६३ चेंडूत नाबाद १०३ धावांची खेळी साकारली. यात त्याने सहा खणखणीत षटकार ठोकले, तर सात चौकारांचा समावेश होता.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा धुव्वा उडविल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला रायझिंग पुणे सुपरजाएंट्स संघाने गुजरात लायन्स संघाला १६१ धावांवर रोखले होते. पण प्रत्युत्तरात गुजरातच्या गोलंदाजांनी चांगली सुरूवात केली. रहाणे, स्मिथ, त्रिपाठी, तिवारी यांना दोन अंकी आकडा देखील गाठता आला नाही. संघाची ४ बाद ४२ अशी केविलवाणी स्थिती असताना स्टोक्सने धोनीच्या सहाय्याने संघाचा डाव सावरला. धोनीने २६ धावांची संयमी खेळी साकारली. पण स्टोक्सच्या वादळापुढे गुजरातच्या गोलंदाजांचा काहीच निभाव लागला नाही.

तत्पूर्वी, गुजरातकडून यावेळी मॅक्क्युलमने ४५ धावांची खेळी साकारली, तर इशान किशनने ३१ धावा ठोकल्या. या दोघां व्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. दिनेश कार्तिकने अखेरच्या षटकापर्यंत फलंदाजी करून धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला, पण तोही २९ धावांवर बाद झाला.

पुण्याकडून फिरकीपटू इम्रान ताहीरने यावेळी गुजरातच्या तीन फलंदाजांना जाळ्यात ओढले, तर जयदेव उनाडकटनेही तीन विकेट्स घेतल्या. शार्दुल ठाकूरने एक विकेट घेतली. पुण्याचा संघ सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्यासाठी आगेकूच करीत आहे. गुजरात लायन्स विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून पुण्याने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पुण्याच्या संघाला चांगला सुर गवसला असल्याने गुजरात विरुद्ध पुण्याचेच पारडे जड होते.