आयपीएलचे यंदाचे पर्व ४ एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यानंतर पुढील दीड महिना भारतात सर्वत्र आयपीएलचीच हवा पाहायला मिळेल. आयपीएल म्हटलं की ट्वेन्टी-२० युद्धाचा थरार अनुभवण्याची एक अनोखी पर्वणीच क्रिकेट रसिकांसाठी असते. सट्टेबाजारात देखील वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळते. पण यंदा आयपीएलला सुरूवात होण्याआधीच सट्टेबाजाराला तेजी आलेली पाहायला मिळत आहे. सट्टेबाजारातील अंदाजानुसार यंदा विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला विजेतेपदाचा दावेदार म्हणून पसंती दिली जात आहे. अद्याप बंगळुरूचा पहिला सामना देखील खेळविण्यात आलेला नाही आणि त्याआधीच सट्टेबाजांनी विराटच्या संघाला विजेता संघ म्हणून घोषित करून टाकले आहे.

आयपीएलमधील सट्टेबाजी आणि मॅच फिक्सिंग प्रकरण उघडकीस आल्यानंतर गेल्या काही वर्षांत स्पर्धेच्या प्रशासकीय समितीकडून सट्टेबाजी रोखण्यासाठी विविध बदल देखील करण्यात आले. याशिवाय, ठोस तरतुदी देखील करण्यात आल्या. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही ध्यास आयपीएलने स्विकारला, पण सट्टेबाजही पुढचे पाऊल टाकून सट्टा लावण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शोधून काढत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सट्टेबाजांनी आयपीएल सामन्यांवर सट्टा लावण्यासाठी यावेळी एक अॅप देखील विकसीत करण्यात आले आहे. सट्टेबाजारात यंदा दोन हजार कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

 

यंदाच्या पर्वाचा विजेता संघ म्हणून सट्टेबाजांनी बंगळुरू संघाला पहिली पसंती दिली आहे, तर धोनीच्या पुणे सुपरजाएंट्स संघाला दुसरे स्थान देण्यात आले आहे. मुंबई इंडियन्स संघाला तिसरी तर गुजरात लायन्स संघाला चौथी पसंती दिली आहे.

सट्टेबाजारात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दर प्रति शंभर रुपयांमागे ३.७५ इतका लावण्यात आला आहे. याचा अर्थ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आयपीएलचा विजेता ठरला तर सट्टा लावणाऱया व्यक्तीस १०० रुपयांच्या बदल्यात ३७५ रुपये मिळतील. तर रायझिंग पुणे सुपरस्टार संघाचा दर ६.१० इतका सुरू आहे. मुंबई इंडियन्स संघाचा दर ६.३० इतका आहे. दोनवेळा आयपीएलचे विजेतेपद भूषविलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा दर ८ रुपये इतका सुरू आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबला शेवटचे स्थान देण्यात आले आहे.