करोना विषाणू संसर्गामुळे तीन क्रिकेटपटू, वानखेडे स्टेडियमचे १० देखरेख कर्मचारी आणि ८ संयोजन समिती सदस्यांना फटका बसल्यानंतर आता इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सोमवारी मुंबईतील जैव-सुरक्षित वातावरणात असलेल्या १४ प्रक्षेपण कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे.

‘आयपीएल’च्या प्रक्षेपणाचे जागतिक प्रसारण करणारे हे मुख्य निमिर्ती चमूतील कर्मचारी मुंबईतील नामांकित हॉटेलमध्ये निवासास होते. या कर्मचाऱ्यांमध्ये कॅमेरामन, निर्मितीतज्ज्ञ, दिग्दर्शक, ईव्हीएस चालक आणि अन्य तांत्रिक मंडळींचा समावेश आहे. ‘आयपीएल’शी निगडित अनेक जैव-सुरक्षित केंद्रांची निर्मिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केली आहे.

मुंबईतील करोना साथीच्या  पार्श्वभूमीवर प्रक्षेपणकत्र्या कंपनीने ‘बीसीसीआय’ला धोक्याचा इशारा दिला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु करोनाची रुग्णसंख्या वाढली तरी मुंबईतील सामने ठरल्याप्रमाणेच होईल, अशी ग्वाही ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुलीने दिली आहे. ‘‘जैव-सुरक्षित वातावरणात खेळाडू किंवा अन्य मंडळी दाखल झाल्यावर सुरुवातीला अशा घटना घडत असतात. संयुक्त अरब अमिरातीमधील गेल्या हंगामातसुद्धा काही खेळाडूंना आणि साहाय्यकांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे स्पर्धेपुढे संकट उभे ठाकले. परंतु स्पर्धा सुरू झाल्यानंतर मात्र सर्व काही सुरळीत पार पाडले,’’ असे गांगुली म्हणाला.

‘आयपीएल’ला सशर्त परवानगी -मलिक

मुंबईतील ‘आयपीएल’ सामन्यांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे, असे राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी स्पष्ट केले. ‘आयपीएल’ सामन्यांचे आयोजन करताना ‘बीसीसीआय’ला महाराष्ट्र राज्य शासनाने लागू केलेल्या सर्व प्रमाणित कार्यपद्धतीचे पालन करण्याची आवश्यकता आहे, असे मलिक यांनी म्हटले आहे. ‘‘मुंबईत १० ते २५ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या १० सामन्यांच्या आयोजनासाठी राज्य शासनाकडून योग्य परवानग्या मिळाल्या आहेत. त्यामुळे जैव-सुरक्षित वातावरणात चिंतेची आवश्यकता नाही. खेळाडू आणि साहाय्यक सुरक्षित आहेत,’’ असे गांगुलीने सांगितले.