सर्वाधिक गुणांसह चेन्नईचा संघ गुणतालिकेत आघाडीवर असला तरी बाद फेरीचे स्थान पक्के करण्यासाठी त्यांना दमदार विजयाची आवश्यकता आहे. अशा स्वरूपाच्या विजयासाठी त्यांच्याकडे नामी संधी आहे, कारण घरच्या मैदानावर त्यांच्यासमोर आहेत दिल्ली डेअरडेव्हिल्स. दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या बाद फेरीत जाण्याच्या आशा मावळल्या आहेत. दुसरीकडे चेपॉक स्टेडियमवर सुपर किंग्सची कामगिरी अफलातून म्हणावी अशीच आहे. गुणतालिकेत तळाच्या संघांमध्ये असणाऱ्या दिल्लीवर मोठा विजय मिळवत दणक्यात बाद फेरी गाठण्याचा चेन्नईचा मानस आहे.
राजस्थान रॉयल्सविरुद्धचा अनपेक्षित पराभव बाजूला ठेवून विजयपथावर परतण्याचा चेन्नईचा प्रयत्न असेल. माइक हसी, सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यावर चेन्नईच्या फलंदाजांची भिस्त आहे. या त्रिकुटाला साथ देण्याची जबाबदारी मुरली विजय, ड्वेन ब्राव्हो आणि एस. बद्रिनाथवर आहे. राजस्थानविरुद्ध १३ षटकांत २ बाद ८६ अशा सुस्थितीत असणाऱ्या चेन्नईला केवळ १४१ धावांचीच मजल मारता आली. चांगल्या दर्जाच्या गोलंदाजी आक्रमणापुढे वर्चस्व गाजवण्यासाठी चेन्नईला मेहनत घ्यावी लागणार आहे.
गोलंदाजीत मोहित शर्मा आणि ड्वेन ब्राव्हो चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. शेवटच्या लढतीत शेन वॉटसनने चेन्नईच्या गोलंदाजांची कत्तल केली होती. त्या पाश्र्वभूमीवर चेन्नईच्या गोलंदाजांना कामगिरीत अचूकता आणावी लागेल. डर्क नॅन्स, बेन लॉलिन, जेसन होल्डर, अ‍ॅल्बी मॉर्केल हे चौघेही छाप सोडण्यात अपयशी ठरल्याने कर्णधार धोनीची चिंता वाढली आहे. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाला धावा रोखणे आणि विकेट्स मिळवणे या दोन्ही आघाडय़ांवर यशस्वी व्हावे लागणार आहे.
दुसरीकडे दिल्लीसाठी ही सन्मानाची लढाई आहे. वीरेंद्र सेहवाग, महेला जयवर्धने, डेव्हिड वॉर्नर ही तीन नावं आंतरराष्ट्रीय स्तरावरचे नामवंत फलंदाज. मात्र या तिघांनाही दिल्लीला विजयपथावर नेण्यात अपयश आले आहे. या तिघांपैकी एकाला सूर गवसल्यास दिल्लीसाठी चमत्कार घडू शकतो. बेन रोहरर, जोहान बोथा, आंद्रे रसेल आणि जीवन मेंडिस ही विदेशी चौकडी पूर्णत: अपयशी ठरल्याने दिल्लीच्या कामगिरीत मोठी घसरण झाली आहे. चेन्नईविरुद्धच्या लढतीत या चौघांना आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी आहे. आयपीएलच्या पाचव्या हंगामात पर्पल कॅपचा मानकरी ठरलेला मॉर्ने मॉर्केल दिल्लीला विजय मिळवून देऊ शकलेला नाही. भारतीय संघात निवड झालेला इरफान पठाण अष्टपैलू चमक दाखवू शकतो. उमेश यादव, शाहबाज नदीम यांच्या कामगिरीत सातत्याची आवश्यकता आहे.

सामना : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स
ठिकाण : चिन्नास्वामी स्टेडियम, चेन्नई
वेळ : रात्री ८ पासून.