03 March 2021

News Flash

पराभवाचे पाढे पंच्चावन !

पराभव इथले संपत नाही, असे वर्णन पुणे वॉरियर्सच्या संघाचे करता येईल. रॉबिन उथप्पा व अँजेलो मॅथ्युज यांची दमदार फलंदाजी होऊनही पुणे वॉरियर्सला पुन्हा एकदा पराभवाला

| May 10, 2013 01:31 am

पराभव इथले संपत नाही, असे वर्णन पुणे वॉरियर्सच्या संघाचे करता येईल. रॉबिन उथप्पा व अँजेलो मॅथ्युज यांची दमदार फलंदाजी होऊनही पुणे वॉरियर्सला पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले. कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा ४६ धावांनी पराभव केला. विजयासाठी १५३ धावांचा पाठलाग करताना पुण्याचा १९.३ षटकांत १०६ धावांमध्ये खुर्दा उडाला. पुण्याचा हा १३ सामन्यांमध्ये ११ वा पराभव आहे. कोलकाता संघाचा हा पाचवा विजय आहे.
पुण्यासाठी १५३ धावांचे लक्ष्य फारसे अवघड नव्हते मात्र सुरुवातीपासूनच त्यांच्या फलंदाजांनी आत्मविश्वासाचा अभाव दाखविला. उथप्पा व मॅथ्युज यांचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य फलंदाजांनी निराशा केली. उथप्पाने सातत्यपूर्ण खेळाची मालिका पुढे ठेवताना २ चौकारांसह ३१ धावा केल्या. पाचव्या क्रमांकावर आलेल्या मॅथ्युजने २८ चेंडूंमध्ये चार षटकारांसह ४० धावा करीत संघास विजय मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. मात्र नंतर पुण्याचा डाव १०६ धावांमध्ये कोसळला.
गहुंजे येथील सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमवर कोलकाता संघाचा कर्णधार गौतम गंभीर याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. हा निर्णय सार्थ ठरविताना त्याने मनविंदर बिस्ला याच्या साथीने सलामीसाठी ५.२ षटकांत ४५ धावांची भागीदारी केली. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बिस्ला यष्टीचीत झाला आणि ही जोडी फुटली. बिस्लाने दोन चौकारांसह १२ धावा केल्या. त्याच्या जागी आलेला जॅक कॅलिस अपयशी ठरला. कारकीर्दीतील पहिलाच आयपीएलचा सामना खेळणाऱ्या परवेझ रसूलने त्याला दोन धावांवर बाद करत कोलकाता संघाला आणखी एक धक्का दिला. कोलकाता संघाची पडझड एवढय़ावरच थांबली नाही. मोर्न मोर्कल केवळ १५  धावांवर मिचेल मार्शच्या गोलंदाजीवर तंबूत परतला. एका बाजूने गंभीरने जबाबदारीने खेळ करीत स्वत:चे अर्धशतक ४३ चेंडूंमध्ये पूर्ण केले. मात्र लगेचच तो मार्शच्या षटकांत बाद झाला. त्याने ४४ चेंडूंमध्ये सहा चौकारांसह ५० धावा केल्या. आक्रमक फटकेबाजीबाबत ख्यातनाम असलेल्या युसुफ पठाणने निराशा केली. केवळ तीन धावांवर तो भुवनेश्वरकुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला. एका बाजूने हे गडी बाद होत असतानाच रियान याने १७ व्या षटकांत अँजेलो मॅथ्युजला एक षटकार व दोन चौकारांसह १७ धावा वसूल केल्या. कोलकाताकडून सर्वाधिक धावा मिळवून देणारे हे षटक ठरले. रायनने २१ चेंडूंत ३१ धावा करताना एक षटकार व दोन चौकार अशी फटकेबाजी केली.
संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ६ बाद १५२ (गौतम गंभीर ५०, रायन टेन डोश्चटे ३१, भुवनेश्वर कुमार ३/२५) विजयी विरुद्ध पुणे वॉरियर्स : १९.३ षटकांत सर्वबाद १०६ (अँजेलो मॅथ्यूज ४०, रॉबिन उथप्पा ३१, लक्ष्मीपती बालाजी ३/१९)
सामनावीर : गौतम गंभीर

प्रेक्षकांची संख्या कमी झाली!
पुणे व कोलकाता हे दोन्ही संघ यंदा लिंबूटिंबू संघांसारखे कामगिरी करीत असल्यामुळे वासरात कोणती लंगडी गाय शहाणी होणार हीच या लढतीबाबत उत्सुकता होती. या दोन्ही संघांकडे फारसे स्टार खेळाडू नसल्यामुळे प्रेक्षकांच्या गॅलरीतील अनेक जागा मोकळ्या दिसत होत्या. आपण तिकिटाकरिता दिलेल्या पैशांचा मोबदला त्यांना अपेक्षेइतकी फटकेबाजी न झाल्यामुळे मिळाला नाही.

दुखापतीमुळे पुणे वॉरियर्सचा स्मिथ मायदेशी रवाना
पुणे वॉरियर्सचा अष्टपैलू खेळाडू स्टीव्ह स्मिथ पाठीच्या दुखापतीने त्रस्त असल्यामुळे आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. दुखापतीवर उपचार घेण्यासाठी स्मिथ मायदेशी रवाना झाला आहे. पुणे वॉरियर्सकडून खेळणारा स्मिथ पाठीच्या दुखापतीने हैराण असून, तो आयपीएलचे आगामी सामने खेळू शकणार नाही. दुखापतींवर उपचार घेण्यासाठी स्मिथ मायदेशी परतणार आहे. ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा स्मिथ हा उपकर्णधार आहे, असे ऑस्ट्रेलियाच्या मंडळाने पत्रकात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2013 1:31 am

Web Title: ipl 2013 kolkata knight riders beat pune warriors by 46 run 2
टॅग : Kolkata Knight Riders
Next Stories
1 राजस्थानला कूपर पावला!
2 खेलो जी जान से !
3 राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा : भारतीयांची विजयी सलामी
Just Now!
X