तो खेळायला लागला की गोलंदाज मती गमावून बसतो, प्रेक्षक त्याचे फटके पाहत बसून त्याचा आनंद लूटतात आणि संघ सहकारी विजयाच्या आनंदात न्हाऊन निघतात, हे चित्र पुन्हा एकदा दाखवून दिले ते धडाकेबाज फलंदाज किरॉन पोलार्डने. मुंबई पराभवाच्या जवळ जातोय असे वाटत असताना पोलार्डने २७ चेंडूंत २ चौकार आणि ८ षटकरांच्या जोरावर नाबाद ६६ धावांची खेळी साकारत संघाला ७ विकेट्सनी विजय मिळवून दिला. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत २० गुणांसह अव्वल स्थान पटकावले.
हैदराबादच्या आव्हानाचा पाठलाग करताना धडाकेबाज सुरुवात करणारा ड्वेन स्मिथ (२१) बाद झाल्यावर सचिन तेंडुलकर (३८) आणि दिनेश कार्तिक यांनी संघाची कमान सांभाळली. सावध सुरुवात करणारा सचिन ऐन बहरात आला होता. करन शर्माच्या १२ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ‘मिड विकेट’ला अप्रतिम षटकार मारल्यावर त्याचा हात दुखावला आणि त्याला जखमी निवृत्त होऊन परतावे लागले. दिनेश कार्तिक (३०) अंबाती रायुडू (२) एकापाठोपाठ बाद झाल्याने मुंबईचा संघ संकटात सापडला होता. थिसारा परेराच्या १७व्या षटकांत २९ धावा वसूल करत पोलार्ड-रोहितने मुंबईला विजयाच्या जवळ आणून ठेवले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकत हैदराबादने फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यांच्या फलंदाजांनी १७८ धावा रचत हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिला. जॉन्सनच्या पहिल्याच षटकात पार्थिव पटेलने (२६) बरसात केली. पटेलनंतर शिखर धवन आणि हनुमा विहारी यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी रचत संघाचा डोलारा सांभाळला. गोलंदजांवर तुटून पडत धवनने ६ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ५९ धावांची सुरेख खेळी साकारली. विहारीने ४१ धावांची खेळी साकारली.
संक्षिप्त धावफलक
सनराजयर्स हैदराबाद : २० षटकांत ३बाद १७८ (शिखर धवन ५९, कॅमेरून व्हाइट नाबाद ४३; लसिथ मलिंगा २/२६) पराभूत वि. मुंबई इंडियन्स : १९.३ षटकांत ३ बाद १८४ (किरॉन पोलार्ड नाबाद नाबाद ६६, सचिन तेंडुलकर जखमी निवृत्त ३८; करन शर्मा २/२२)
सामनावीर : किरॉन पोलार्ड.

टिट-बिट्स
सुरक्षा रक्षकांच्या जाचाचा प्रेक्षकांना त्रास
आंतरराष्ट्रीय सामन्यांना जेवढा सुरक्षेचा जाच नसतो, तेवढा आयपीएलच्या सामन्यांदरम्यान असल्याचे साऱ्यांनाच या हंगामात जाणवले. पण सोमवारच्या सामन्यात तर सुरक्षा रक्षकांच्या जाचाला प्रेक्षक कंटाळले होते. दुसऱ्या क्रमांकाच्या द्वाराकडून देण्यात येणाऱ्या प्रवेशाची लांबी वाढवण्यात आली होती. दरवेळी दुसऱ्या क्रमांकाच्या द्वाराच्या जवळून प्रवेश देण्यात येत होता. पण या सामन्याच्या वेळी मरिन ड्राइव्हच्या समुद्र किनाऱ्याच्या दिशेने प्रेक्षकांना यावे लागत होते. तब्बल पाच वेळा त्यांची तपासणी करण्यात आली. सुरक्षा महत्त्वाची आहे, हे सर्वच जाणतात, पण या जाचाचा त्रास होऊ नये, एवढेच प्रेक्षकांचे म्हणणे होते.
प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद
अक्षय्य तृतीया म्हणजे सोनेखरेदीसाठी शुभ मुहूर्त. एलबीटीचा संप असूनही आजच्या दिवशी ज्वेलर्सनी दुकाने उघडल्याने मुंबईकरांचा कल सोने खरेदीकडे होता. त्याचा काहीसा परिणाम वानखेडेवरही झाला. गेल्या काही सामन्यांमध्ये हाऊसफुल्ल असलेले वानखेडे सोमवारी मात्र थोडेसे रिकामे दिसत होते.
    – प्रसाद मुंबईकर