ज्या खेळपट्टीवर चेन्नईच्या ‘सुपर किंग्ज’ फलंदाजांना एकही षटकार खेचता आला नाही, तिथे शेन वॉटसनने जोरदार ‘हल्लाबोल’ करीत सहा उत्तुंग षटकारांची आतषबाजी करीत सर्वाच्याच डोळ्यांचे पारणे फेडले. चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांची लक्तरे वेशीवर टांगत वॉटसनने ३४ चेंडूंत ७० धावांनी शानदार खेळी साकारली. त्यामुळेच राजस्थान रॉयल्सने बलाढय़ चेन्नई सुपर किंग्जवर १७ चेंडू आणि पाच विकेट राखून रुबाबदार विजय मिळवला. या विजयानिशी राजस्थानने १४ सामन्यांतील २० गुणांनिशी आयपीएल गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे.
राजस्थानची सुरुवात खराब झाली. अजिंक्य रहाणे (९), जेम्स फॉल्कनर (१) आणि संजू सॅमसन (०) हे दिग्गज फलंदाज तंबूत परतल्यामुळे राजस्थानची ३ बाद १९ अशी केविलवाणी अवस्था झाली. कप्तान राहुल द्रविड(२२)ने एका बाजूने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वॉटसनने चेन्नईच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत ४५ चेंडूंत ९३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत राजस्थानला संस्मरणीय विजय मिळवून दिला.
वॉटसनने आर. अश्विनच्या ११व्या षटकात दोन षटकार खेचले. मग ड्वेन ब्राव्होच्या १४व्या षटकात तीन षटकारांची आतषबाजी करीत एकंदर २२ धावा काढल्या. ख्रिस मॉरिसच्या १५व्या षटकात वॉटसनने चार चौकारांची अदाकारी पेश करीत १६ धावा काढल्या. वॉटसनला तोलामोलाची साथ देणाऱ्या स्टुअर्ट बिन्नीने २३ चेंडूंत २ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ४१ धावांची उपयुक्त खेळी साकारली. जडेजाला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने षटकार मारून बिन्नीने राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्याआधी, दमदार सुरुवात करूनही चेन्नई सुपर किंग्जला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. २० षटकांत त्यांनी ४ बाद १४१ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईला सलामीवीर मायकेल हसी आणि मुरली विजय यांनी ११.३ षटकांत ८३ धावांची सलामी नोंदवून दिली. परंतु त्यानंतर सुरेश रैना (१) आणि कप्तान महेंद्रसिंग धोनी (२) यांनी निराशा केल्यामुळे चेन्नईचा धावांचा आलेख मंदावला.
विजयने सहा चौकारांसह ५० चेंडूंत सर्वाधिक ५५ धावा केल्या, तर हसीने ४० चेंडूंत सहा चौकारांनिशी ४१ धावांचे योगदान दिले. हाणामारीच्या षटकांमध्ये ड्वेन ब्राव्होने ११ चेंडूंत चार चौकारांच्या साहाय्याने नाबाद २३ धावा केल्या. राजस्थानकडून केव्हॉन कुपरने ३२ धावांत २ बळी घेतले. या खेळपट्टीवर गोलंदाजांसाठी अनुकूल वातावरण होते.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज : २० षटकांत ४ बाद १४१ (मायकेल हसी ४०, मुरली विजय ५५, ड्वेन ब्राव्हो २३; केव्हॉन कुपर २/३२) पराभूत वि. राजस्थान रॉयल्स : १७.१ षटकांत ५ बाद १४४ (राहुल द्रविड २२, शेन वॉटसन ७०, स्टुअर्ट बिन्नी नाबाद ४१; जेसॉन होल्डर २/२०)
सामनावीर : शेन वॉटसन.