क्रिकेटला अधिकाधिक पैसा आणि ग्लॅमर मिळवून देणाऱ्या आयपीएलच्या सातव्या हंगामात कोणत्या संघात नेमके कोण खेळाडू असतील, याची उत्सुकता साऱ्याच क्रिकेटप्रेमींना लागली असून याचे उत्तर येत्या बुधवारी स्पष्ट होऊ शकेल. आयपीएलच्या सातव्या हंगामाच्या लिलावाला १२ फेब्रुवारीला सुरुवात होणार असून, यामध्ये एकूण ५१४ खेळाडूंचा समावेश असेल. या लिलावासाठी अत्युत्कृष्ट खेळाडूंची विशेष यादी (मार्की) तयार करण्यात आली असून, त्यांना लिलावासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. भारताचा धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, इंग्लंडचा माजी तडाखेबंद फलंदाज केव्हिन पीटरसन यांच्यासह १६ जणांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
लिलावासाठी सुरुवातीला ६५१ खेळाडूंची यादी तयार करण्यात आली होती, पण आयपीएल प्रशासकीय समितीने यामधून छाननी करत ५१४ खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या २१९ खेळाडूंचा सहभाग आहे. या २१९ क्रिकेटपटूंमध्ये १६९ भारतीय, तर ५० विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. आयपीएलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच देशाचे प्रतिनिधित्व न केलेल्या क्रिकेटपटूंची संख्या २९२ एवढी असून यामधील २५५ क्रिकेटपटू भारताच्या स्थानिक क्रिकेटमधील आहेत. या लिलावासाठी खेळाडूंची ५३ गटांमध्ये विभागणी करण्यात आली असून प्रत्येक गटामध्ये ८ ते१० खेळाडूंचा सहभाग असेल.
पीटरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला तरी त्याची ख्याती धडाकेबाज फलंदाज म्हणून कायम आहे आणि त्यामुळेच ‘मार्की’ खेळाडूंमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. मार्की’ यादीतील पहिल्या खेळाडूंना ‘एम १’ आणि दुसऱ्या यादीतील खेळाडूंना ‘एम २’ असे संबोधण्यात येणार आहे. ‘एम १’ यादीमध्ये पीटरसनसह सेहवाग, युवराज, डेव्हिड वॉर्नर, जॅक कॅलिस, महेला जयवर्धने, मिचेल जॉन्सन, मुरली विजय यांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीतील सर्व
खेळाडूंची मूळ किंमत दोन कोटी रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. ‘
गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. लिलावाच्या २५व्या गटामध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण धावा करणाऱ्या फलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. या गटामध्ये महाराष्ट्राचा विजय झोल आणि केदार जाधवसह दिल्लीच्या उन्मुक्त चंदचा समावेश आहे. तर २७व्या गटामध्ये जम्मू आणि काश्मीर संघाचा कर्णधार आणि दर्जेदार अष्टपैलू परवेझ रसूलचा समावेश करण्यात आला आहे, त्याचबरोबर यंदाच्या रणजी स्पर्धेमध्ये सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या हिमाचल प्रदेशच्या रिषी धवनचा या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

*    आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू : २१९
*    भारताचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू : १६९
*    अन्य देशांचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू : ५०
*    देशाचे प्रतिनिधित्व न केलेले खेळाडू : २९२
*    देशाचे प्रतिनिधित्व न केलेले भारतीय खेळाडू : २५५

‘मार्की’ म्हणजे काय?
‘मार्की’ म्हणजे अत्युत्कृष्ट. आयपीएलच्या लिलावासाठी करण्यात आलेल्या अत्युत्कृष्ट खेळाडूंच्या यादीला हेच नाव ठेवण्यात आले आहे. या विशेष यादीत चांगली गुवणत्ता व लोकप्रियता असलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. या यादीचे ‘एम १’ आणि ‘एम २’ असे दोन गट करण्यात आले आहे. ‘एम १’ गटातील यादीतील खेळाडूंची मूळ रक्कम दोन कोटी रुपये एवढी ठेवण्यात आली आहे, तर ‘एम २’ गटातील खेळाडूंची मूळ किंमत १ ते २ रुपयांदरम्यान ठेवण्यात आली आहे.

‘मार्की’ खेळाडूंची यादी
*    ‘एम १’ : वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, मुरली विजय, केव्हिन पीटरसन, जॅक कॅलिस, महेला जयवर्धने, डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल जॉन्सन.
*    ‘एम २’ : जॉर्ज बेली, फॅफ डय़ू प्लेसिस, मायकेल हसी, दिनेश कार्तिक, झहीर खान, ब्रेन्डन मॅक्क्युलम, अमित मिश्रा व डॅरेन सॅमी.