कोणत्याही अडचणीतून संघाला सहिसलामत सावरण्याची आणि अशक्यप्राय विजय मिळवून देण्याची क्षमता आणि कलात्मकता कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडे आहे. धोनीने आपल्या याच कर्तृत्वाचा प्रत्यय मंगळवारी घडवला. त्यामुळेच चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या आयपीएल लढतीत पाच विकेट व दोन चेंडू शिल्लक असतानाच विजय साजरा केला. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. या विजयासह चेन्नईने आयपीएल गुणतालिकेत आघाडीच्या स्थानावर मुसंडी मारली आहे.
शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात चेन्नईपुढे विजयासाठी १४९ धावांचे माफक आव्हान होते. ड्वेन स्मिथ (पाच चौकार व दोन षटकारांसह ४४) व फॅफ डय़ू प्लेसिस (दोन चौकारांसह ३८) यांनी दमदार खेळ करूनही चेन्नईपुढे शेवटच्या दोन षटकांत २५ धावांचे लक्ष्य राहिले होते. घरच्या मैदानावर आपल्या नावलौकिकास साजेसा खेळ करीत धोनीने १६ चेंडूंत नाबाद २६ धावा केल्या. त्याला रवींद्र जडेजा (नाबाद ११) याने चांगली साथ दिली. धोनीने २०व्या षटकात जेम्स फॉल्कनर याला सुरेख षटकार व त्यापाठोपाठ दोन चेंडूंत आणखी पाच धावा वसूल करीत संघाला विजयश्री मिळवून दिली. राजस्थान संघाकडून अंकित शर्माने दोन बळी घेतले.
त्याआधी, प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने निर्धारित षटकांत ८ बाद १४८ धावांपर्यंत मजल मारली. त्याचे मुख्य श्रेय शेन वॉटसनला द्यावे लागेल. त्याने तीन चौकार व चार षटकारांसह ५१ धावा केल्या. अंकित शर्माने चार चौकार व एक षटकारासह ३० धावा केल्या. स्टुअर्ट बिन्नीने दोन षटकारांसह २२ धावा वसूल केल्या. या तीन फलंदाजांचा अपवाद वगळता राजस्थानचा एकही फलंदाज दोनआकडी धावा करू शकला नाही. चेन्नईकडून मोहित शर्माने ३१ धावांत तीन बळी घेतले तर जडेजाने १८ धावांमध्ये दोन बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स : २० षटकांत ८ बाद १४८ (अंकित शर्मा ३०, शेन वॉटसन ५१; मोहित शर्मा ३/३१, रवींद्र जडेजा २/१८) पराभूत वि. चेन्नई सुपर किंग्ज : १९.४ षटकांत ५ बाद १४९ (ड्वेन स्मिथ ४४, फॅफ डय़ू प्लेसिस ३८, महेंद्रसिंह धोनी नाबाद २६; अंकित शर्मा २/२०).
सामनावीर : रवींद्र जडेजा.