शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने चेन्नई सुपर किंग्जवर एक चेंडू व पाच विकेट राखून रोमहर्षक विजय मिळविला. या विजयामुळे बंगळुरू संघाच्या आयपीएलच्या सातव्या मोसमात बाद फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
विजयासाठी १३८ धावांचे माफक आव्हान असूनही बंगळुरूला विजयासाठी झगडावे लागले. शेवटच्या महत्त्वपूर्ण षटकांमध्ये त्यांचा भरवशाचा आक्रमक फलंदाज ए बी डी’ व्हिलियर्सने १४ चेंडूंत २८ धावा करताना एक चौकार व तीन षटकार अशी आतषबाजी केली. तोच सामनावीर ठरला. युवराज सिंगने एक षटकारासह नाबाद १३ धावा करताना त्याला चांगली साथ दिली. त्यामुळेच त्यांना विजय साकारता आला. बंगळुरूच्या ख्रिस गेल (तीन चौकार व तीन षटकारांसह ४६) व विराट कोहली (एक चौकार व एक षटकारासह २७) यांनी विजयाचा पाया रचला.
प्रथम फलंदाजी करताना चेन्नईची एक वेळ २ बाद २९ अशी दयनीय स्थिती होती. परंतु सुरेश रैनाने ४८ चेंडूंत ६२ धावा करताना एक षटकार व सहा चौकार अशी फटकेबाजी केली. डेव्हिड हसीने २९ चेंडूंत २५ धावा करताना एक चौकार व एक षटकार अशी टोलेबाजी केली. बंगळुरू संघाकडून वरुण आरोनने २९ धावांमध्ये दोन बळी घेतले. या सामन्यातील विजयासह बंगळुरू संघाने ११ सामन्यांमध्ये १० गुणांची कमाई केली आहे.

संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज : २० षटकांत ४ बाद १३८ (सुरेश रैना ६२, डेव्हिड हसी २५; वरुण आरोन २/२९) पराभूत वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : १९.५ षटकांत ५ बाद १४२ (ख्रिस गेल ४६, विराट कोहली २७,  ए बी डी’व्हिलियर्स २८; आर. अश्विन २/१६).
सामनावीर : ए बी डी’व्हिलियर्स.