कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स- दोन्ही संघांमध्ये दर्जेदार खेळाडूंचा समावेश आहे. मात्र तरीही यंदाच्या आयपीएलमध्ये दोन्ही संघ विजयी लय सापडण्यासाठी धडपडत आहेत. कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार केव्हिन पीटरसन या दोघांवर दोन्ही संघांची भिस्त आहे. गंभीरला कामगिरीत सातत्य राखावे लागणार आहे तर पीटरसनला लौकिकाला साजेसा खेळ करावा लागणार आहे. कोलकातासाठी रॉबिन उथप्पा हुकमी एक्का होऊ शकतो. मात्र बाकी फलंदाजांना त्याला साथ देणे गरजेचे आहे. मॉर्ने मॉर्केल, आंद्रे रसेल, उमेश यादव, विनय कुमार एकालाही सातत्याने कामगिरी करता आलेले नाही. शकीब उल हसनला आपली उपयुक्तता सिद्ध करावी लागणार आहे.
दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी जेपी डय़ुमिनी, क्विंटन डि कॉक आणि केदार जाधव हे त्रिकुट महत्त्वाचे आहे. दिनेश कार्तिक सातत्यपूर्ण खेळ करण्यात अपयशी ठरत आहे. गोलंदाजीत शाहबाझ नदीम, वेन पारनेल, शमी मोहम्मद, राहुल शुक्ला यांच्यावर धावा रोखण्याबरोबरच विकेट्स काढण्याची जबाबदारी आहे.

सौरभ तिवारी आयपीएलमधून बाहेर
नवी दिल्ली : खांद्याच्या दुखापतीमुळे दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा सौरभ तिवारी आयपीएलचे उर्वरित सामने खेळू शकणार नाही. झारखंडच्या या धडाकेबाज फलंदाजाने यंदाच्या आयपीएलमध्ये एकही सामना खेळलेला नाही. मात्र खांद्याला झालेली दुखापत बळावल्याने तिवारीने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.