लेंडल सिमॉन्स आयपीएलच्या सातव्या हंगामातील पहिल्यावहिल्या शतकाची नोंद केली. ६१ चेंडूंत १४ चौकार आणि दोन षटकारांची आतषबाजी करीत नाबाद १०० धावा काढताना त्याने क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्यामुळे गतविजेत्या मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबला पराभवाचा धक्का दिला. या विजयामुळे मुंबई इंडियन्सने १० गुण आणि सरस धावगतीच्या बळावर पाचव्या स्थानावर मुसंडी मारून ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान मिळवण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.
सिमॉन्सने प्रथम माइक हसीसोबत ६८ धावांची सलामी दिली. यात हसीचे योगदान होते फक्त ६ धावांचे. त्यानंतर सिमॉन्सने अंबाती रायुडू (१७) सोबत दुसऱ्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. मग कर्णधार रोहित शर्माच्या (१८) साथीने ३७ धावांची भागीदारी केली. या तीन महत्त्वाच्या भागीदाऱ्या मुंबईसाठी महत्त्वाच्या ठरल्या.
त्याआधी, मधली फळी कोसळल्यानंतरही किंग्ज इलेव्हन पंजाबने ८ बाद १५६ अशी धावसंख्या उभारली. कर्णधार जॉर्ज बेलीने सर्वाधिक ३९ धावा काढल्या, तर मनन व्होरा आणि शॉर्न मार्श यांनी अनुक्रमे ३६ आणि ३० धावांचे योगदान दिले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबने पहिल्या १० षटकांत २ बाद ९० अशी मजल मारली होती. परंतु त्यानंतर त्यांचा डाव कोसळला.

संक्षिप्त धावफलक
किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ८ बाद १५६ (जॉर्ज बेली ३९, मनन व्होरा ३६, शॉन मार्श ३०; श्रेयस गोपाळ २/३२, जसप्रित बुमराह २/३१) पराभूत वि. मुंबई इंडियन्स : १९ षटकांत ३ बाद १५९ (लेंडल सिमॉन्स नाबाद १००, रोहित शर्मा १८; अक्षर पटेल १/२७)
सामनावीर : लेंडल सिमॉन्स.