मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघामध्ये सलामीची लढत वानखेडेवर रंगणार
ट्वेन्टी-२० विश्वचषकाची बहार ओसरताना आता आयपीएलची झिंग चढायला सुरुवात झाली आहे. आयपीएलचे यंदाचे नववे वर्ष. या आयपीएलच्या ‘नव’लाईला शनिवारपासून प्रारंभ होत आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि नव्याने आयपीएलमध्ये दाखल झालेल्या रायझिंग पुणे सुपरजाएंट्स या संघांमध्ये वानखेडे स्टेडियमवर सलामीची लढत रंगणार आहे. त्यामुळे या लढतीत गतविजेता मुंबई विजयाची बोहनी करणार की पुण्याचे सुपरजायंट्स विजयानिशी सुरुवात करणार, याची उत्सुकता साऱ्यांना असेल. राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील सामन्यांबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली होती. पण उच्च न्यायालयाने पहिला सामना खेळायला परवानगी दिली आहे. त्यामुळे वानखेडेवर सलामीच्या लढतीला चाहत्यांची चांगली गर्दी होण्याची अपेक्षा आहे.
लसिथ मलिंगा दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकणार असला तरी मुंबईचा संघ स्पर्धेचा प्रबळ दावेदार वाटत आहे. विश्वचषकात भारतीय संघातील दोन युवा खेळाडूंनी आपले लक्ष वेधून घेतले होते आणि हे दोन्ही खेळाडू मुंबईच्या ताफ्यात आहेत. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा भन्नाट फॉर्मात आहे. संघाला चांगली सुरुवात करून देण्याबरोबरच अखेरच्या षटकांमध्ये त्याने भेदक मारा केला आहे. संघातील मलिंगाची उणीव तो भरून काढू शकतो. त्याचबरोबर अष्टपैलू हार्दिक पंडय़ाच्या कामगिरीवरही साऱ्यांचे लक्ष असेल. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला विश्वचषकात समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती, त्यामुळे त्याच्या फॉर्मबाबत संघाला चिंता असेल. विश्वचषकात इंग्लंडच्या संघातील यष्टिरक्षक जोस बटलरने चांगल्या धावा केल्या होत्या, त्यामुळे मुंबईला त्याच्याकडून मोठय़ा अपेक्षा असतील. विश्वचषकात वानखेडेवर भारताचा विजयरथ रोखणारा लिंडेल सिमोन्स मुंबईच्या डावाची सुरुवात करेल. त्याचबरोबर किरॉन पोलार्ड, कोरे अँडरसन या अष्टपैलूंची कामगिरी पाहण्यासाठी सारेच उत्सुक आहेत. मुंबईकडे हरभजन सिंगच्या रूपात चांगला फिरकीपटू आहे. पण त्याला भारतीय संघाने विश्वचषकात एकदाही संधी दिली नव्हती. त्यामुळे या संधीचा फायदा हरभजनला उचलता येतो का, हे पाहावे लागेल.
पुण्याचा संघ आयपीएलसाठी नवीन असला तरी त्यामधील खेळाडू क्रिकेट जगताला चांगलेच परिचित आहेत. सर्वात यशस्वी कर्णधार अशी बिरुदावली मिरवणारा महेंद्रसिंग धोनीकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. त्याचबरोबर अजिंक्य रहाणे, केव्हिन पीटरसन, फॅफ डय़ू प्लेसिस, स्टिव्हन स्मिथसारखे नावाजलेले खेळाडू संघात आहेत. गोलंदाजीमध्ये आर. अश्विन आणि ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅडम झाम्पा यांच्यावर साऱ्यांच्या नजरा असतील.

संघ
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), लिंडेल सिमोन्स, पार्थिव पटेल, किरॉन पोलार्ड, अंबाती रायुडू, हार्दिक पंडय़ा, हरभजन सिंग, कोरे अँडरसन, मिचेल मॅक्लेघन, जोस बटलर, उन्मुक्त चंद, र्मचट डी लँग, सिद्धेश लाड, जसप्रीत बुमरा, श्रेयस गोपाल, टीम साऊथी, जगदीश सुचित, आर. विनय कुमार, कृणाल पंडय़ा, नथू सिंग, अक्षय वाखरे, नितीश राणा, जितेश शर्मा, किशोर कामत आणि दीपक पुनिया.
रायझिंग पुणे सुपरजायंट्स : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), अजिंक्य रहाणे, केव्हिन पीटरसन, फॅफ डय़ू प्लेसिस, स्टिव्हन स्मिथ, मिचेल मार्श, जसकिरण सिंग, आर. अश्विन, अंकित चव्हाण, अ‍ॅल्बी मॉर्केल, इरफान पठाण, इशांत शर्मा, ईश्वर पांडे, थिसारा परेरा, सौरभ तिवारी, आर. पी. सिंग, रजत भाटिया, अंकुश बैन्स, बाबा अपराजित, मुरुगन अश्विन, अशोक दिंडा, दीपक चहार, स्कॉट बोलँड, पीटर हँडस्कॉम्ब आणि अ‍ॅडम झाम्पा.

1

2

3