देशातील सर्वात लोकप्रिय ट्वेन्टी-२० लीग म्हणून ओळख प्राप्त केलल्या आयपीएलच्या यंदाच्या पर्वासाठीची तयारी लवकरच सुरू होणार असल्याची चर्चा आहे. आयपीएलमधील संघांमध्ये लवकरच आपल्या संघात सर्वोत्तम खेळाडू समाविष्ट करून घेण्यासाठीची चढाओढ होणार आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव होणार असल्याची माहिती समोर आली आहे आणि यंदाचा लिलाव मुंबईत होणार असल्याचेही समजते.

 

गेल्या तीन वर्षांपासून खेळाडूंचा लिलाव बंगळुरूत करण्यात आला होता. पण यावेळी लिलावाच्या कार्यक्रमाचे ठिकाण बदलण्यात आले आहे. आयपीएलच्या स्पर्धेचे पहिले पर्व मुंबईतून सुरू झाले होते. २००८ साली मुंबईत आठ संघांसाठी खेळाडूंचा लिलाव झाला होता. पुढील वर्षी गोव्यात लिलाव करण्यात आला, मग २०१० साली पुन्हा एकदा मुंबईत लिलाव घेण्यात आला. त्यानंतर आजवर आयपीएलच्या एकाही पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव मुंबईत झाला नाही. बंगळुरूत आतापर्यंत आयपीएलच्या पाच पर्वांसाठी खेळाडूंचा लिलाव झाला होता.
‘क्रिकेटनेस्ट’ला आयपीएलच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय यंदा आयपीएलचा लिलाव पुन्हा एकदा मुंबईत आयोजित करण्याच्या विचारात आहे. बीसीसीआयचे मुख्यालय आणि काम करण्यात सहजता येईल, यासाठी खेळाडूंचा लिलाव मुंबईत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.