युवराज सिंगला पहिल्याच सामन्यात गवसलेला सुर जर संपूर्ण स्पर्धेत असाच कायम राहिला तर संघाचे विजेतेपद कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही, असा विश्वास सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने व्यक्त केला. युवराजने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात २७ चेंडूत ६२ धावांची तडाखेबाज खेळी साकारली. युवराजच्या खेळीचे वॉर्नरने कौतुक केले.

टीव्हीवर तेव्हा पाहिलेला तडाखेबाज युवराज मला प्रत्यक्षात पाहायला मिळाला. युवराजचे फटके अतिशय अचूक आणि बिनधास्त होते. युवी आत्मविश्वसाने खेळणारा खेळाडू आहे. त्याला आपण कसं खेळायला हवं हे खूप अचूक माहित आहे आणि त्यासाठीच तो नेहमी प्रयत्नशील असतो, असे वॉर्नर म्हणाला.

 

युवीने अशी कामगिरी यापुढेही केली, तर स्पर्धेच्या अंतिम फेरीत आम्ही सहज पोहोचू आणि जिंकू सुद्धा, असेही वॉर्नरने सांगितले. वॉर्नरने युवीसह संघातील सर्वच खेळाडूंना विजयाचे श्रेय दिले. संघाला खूप चांगली सुरूवात मिळाली आहे. या विजयातून आम्हाला खूप आत्मविश्वास मिळाला आहे. गतविजेतेपदाचा दबाव सामना सुरू होण्यापूर्वी आमच्यावर होता, पण ज्यापद्धतीने आम्ही पहिला सामना खेळलो त्यातून खूप आत्मविश्वास मिळाला. मधल्या आणि सुरूवातीच्या फळीने अफलातून कामगिरी केली. हैदराबादच्या खेळपट्टीवर दोनशे धावांचा आकडा गाठणे वाखाणण्याजोगे असल्याचे वॉर्नरने सांगितले.