दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियमवर गुरूवारी दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध गुजरात लायन्समध्ये रंगलेला सामना ऐतिहासिक ठरला. गुजरातच्या २०९ धावांच्या तगड्या आव्हानाचा दिल्लीच्या संघातील दोन युवा भारतीय खेळाडूंनी नेटाने सामना केला. ऋषभ पंत आणि संजू सॅमसन हे दोन अनमोल खेळाडू या सामन्यातून भारताला मिळाले. रणजी सामन्यांत सातत्यपूर्ण कामगिरी करून या दोघांनी याआधीच सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. पण आयपीएलमध्ये दोघांनी चमकदार कामगिरी करून सर्वांची मनं जिंकली आहेत.

गुजरात लायन्सविरुद्धचा सामना खेचून आणल्यानंतर दिल्ली डेअरडेव्हिल्सचा प्रशिक्षक आणि माजी फलंदाज राहुल द्रविडनेही या दोघांचे कौतुक केले. सामन्यानंतर ‘आयपीएल टी-२० डॉटकॉम’वर राहुलने संजू सॅमसन आणि ऋषभ पंत यांची मुलाखत घेतली. खरंतर या मुलाखतीत राहुलने दोघांसोबत धमाल केली. मैदानात टिच्चून फलंदाजी करून प्रतिस्पर्धी गोलंदाजांना हैराण करून सोडण्यात हातखंडा असलेल्या द्रविडने ऋषभ-सॅमसनचे कौतुक करताना बरं झालं या दोघांनी माझ्या फलंदाजीचे व्हिडिओ जास्त पाहिले नाहीत, नाहीतर आज इतकी चांगली कामगिरी करता आली नसती, असं म्हणून धम्माल उडवून दिली.

ऋषभ पंतने गुजरातचे २० षटकांत २०९ धावांचे आव्हान स्विकारून ४३ चेंडूत ९७ धावांची वादळी खेळी साकारली होती. तर संजू सॅमसनने ३१ चेंडूत ६१ धावा ठोकल्या होत्या. दोघांनी १४३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली होती. ऋषभ आणि सॅमसनच्या दमदार खेळीच्या जोरावर दिल्लीने गुजरातचे आव्हान १५ चेंडू राखून गाठले होते.

राहुल द्रविड भारतीय संघाला भरवशाचा फलंदाज म्हणून ओळखला जायचा. कोणतीही जोखीम न पत्करता योग्य चेंडूची वाट पाहून खेळण्यावर द्रविडचा भर असे. पण ट्वेन्टी-२० सारख्या झटपट क्रिकेटमध्ये डोंगराएवढे आव्हान समोर असताना फलंदाजाला कमीत कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा ठोकण्याची गरज असते. अशावेळी ऋषभ आणि सॅमसन या दोघांनी आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवले. याचेच द्रविडने अनोख्या अंदाजात कौतुक केले. पाहा काय म्हणाला द्रविड-