आयपीएलचे दहावे पर्व सध्या रोमांचक टप्प्यावर पोहोचले असताना गुजरात लायन्स संघाला मोठा धक्का बसला आहे. गुजरात लायन्सचा धडाकेबाज सलामीवर ब्रॅण्डन मॅक्क्युलम याला दुखापतीमुळे स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांमधून माघार घ्यावी लागली आहे. मॅक्क्युलमला पोटरीतील दुखापतीमुळे पुढील तीन ते चार आठवडे सक्तीचा आराम करण्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मॅक्क्युलमला पुढील सामन्यांत गुजरातचे प्रतिनिधीत्व करता येणार नाही. मॅक्क्युलमसोबतच गुजरातला आणखी धक्का म्हणजे संघाचा गोलंदाज नथू सिंग देखील दुखापतीमुळे बाहेर आहे. त्यामुळे गुजरातचा संघ आता पेचात सापडला आहे.

मॅक्क्युलम यंदाच्या पर्वात दमदार फॉर्मात पाहायला मिळाला. त्याने ११ सामन्यांमध्ये ३३० धावा ठोकल्या आहेत. यात दोन अर्धशतकी खेळींचाही समावेश आहे. मॅक्क्युलमने यंदा १४५.५० च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या.

दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना मॅक्क्युलमला दुखापत झाली होती. तर नथू सिंग याला गुजरातच्या घरच्या मैदानात किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यानंतर तो एकही सामना खेळू शकलेला नाही.