मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीचे सर्वात महत्त्वाचे अस्त्र असलेल्या जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर संघाने आजवर अनेक सामने जिंकले आहेत. नुकतेच गुजरात लायन्स विरुद्धच्या अटीतटीच्या लढतीत बुमराहने ‘सुपरओव्हर’मध्ये मुंबई इंडियन्सला विजयाची चव चाखून दिली. सहा चेंडूत १२ धावांचे लक्ष्य बुमराहने गुजरातला गाठू दिले नाही. फलंदाजाच्या थेट पायात चेंडू टाकण्याचे कौशल्य असलेल्या बुमराह आता टी-२० स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून ओळखला जातो. बुमराहच्या यॉर्कर गोलंदाजीच्या सातत्याचेही कौतुक केले जाते. पण खुद्द बुमराह आपल्या यॉर्कर गोलंदाजीचे संपूर्ण श्रेय श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा सदस्य असलेल्या लसिथ मलिंगा याला देतो.

”ड्रेसिंग रुममध्ये आखल्या जाणाऱ्या योजनांमधून मला खूप मदत झाली. नियोजित योजना अंमलात आणण्याचा आमचा प्रयत्न असतो. टी-२० मध्ये धावा रोखण्यासाठी गोलंदाजाकडे यॉर्कर हे उत्तम अस्त्र असते. यॉर्कर गोलंदाजी करण्यात सातत्य राखण्यासाठी मला मलिंगाने मदत केली. मलिंगाच्या मार्गदर्शनामुळे खूप मदत झाली.”, असे बुमराह म्हणाला.