सुरेश रैनाने कर्णधारी खेळी साकारून गुजरात लायन्स संघाला कोलकाता नाईट रायडर्स संघावर विजय प्राप्त करून दिला. रैनाच्या ४६ चेंडूतील ८६ धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर गुजरातने सामना जिंकला. कोलकाता नाईट रायडर्सने वीस षटकांमध्ये पाच विकेट गमावून गुजरात लायन्ससमोर विजयासाठी १८८ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात गुजरातची सुरूवात देखील चांगली झाली होती. ब्रॅण्डन मॅक्क्युलमने आपल्या नेहमीच्या स्फोटक अंदाजात सुरूवात केली, तर यावेळी आरोन फिंचलाही चांगला सुर गवसला होता. अवघ्या तीन षटकांमध्ये गुजरात लायन्स संघ बिनबाद ४२ अशी स्थितीत होता. आरोन फिंच(३१) झेलबाद झाला. त्यानंतर पावसाच्या व्यत्ययानंतर सामन्याला अर्ध्यातासाच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरूवात झाली आणि मॅक्क्युलमच्या(३३) रुपात कोलकाताला मोठे यश मिळाले.

मॅक्क्युलम बाद झाल्यानंतर रैनाने कर्णधारी जबाबदारी स्विकारून मैदानात टिच्चून फलंदाजी केली. अखेरच्या षटकापर्यंत मैदाननात उभं राहून रैनाने सामना खेचून आणला. ९ चौकार आणि चार खणखणीत षटकार ठोकत रैनाने ४६ चेंडूत ८४ धावांची खेळी साकारली.

तत्पूर्वी, सामन्याची नाणेफेक जिंकून गुजरात लायन्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण कोलकाताकडून यावेळी सलामी फलंदाजीला पाठविण्यात आलेल्या सुनील नरेन याने तुफान फटकेबाजी करत गुजरातच्या नाकी नऊ आणले होते. नरेनने केवळ १७ चेंडूत ४२ धावा ठोकल्या. यात त्याने ९ खणखणीत चौकार आणि एक षटकार ठोकला. कोलकाताची सुरूवात ज्या गतीने झाली त्यानुसार संघ दोनशेचा आकडा गाठेल असे वाटले होते. नरेन बाद झाल्यानंतर गंभीर देखील ३३ धावांवर बाद झाला. मग रॉबीन उथप्पाने यावेळी संघाची कमान सांभाळली. उथप्पाने ४८ चेंडूत ७२ धावांची खेळी साकारली. तर अखेरच्या षटकात युसूफ पठाण याने ४ चेंडूत नाबाद ११ धावा ठोकल्या.