आयपीएलमधील खेळाडूंच्या लिलावात १४८ कोटींचा वर्षांव; ३५० खेळाडू उपलब्ध; भारताचे प्रतिनिधित्व न केलेल्या खेळाडूंवर लक्ष

भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी (बीसीसीआय) सोन्याची अंडी देणारी स्पर्धा म्हणून ओळख असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेत सोमवारी ७६ खेळाडू मालामाल होणार आहेत. बंगळुरू येथे होणाऱ्या लिलावात आठ संघ ३५०हून अधिक खेळाडूंमधून १४८.३३ कोटी रुपयांचा वर्षांव करून खेळाडूंची निवड करणार आहेत. यामध्ये एकूण २८ परदेशी खेळाडूंना चमूत स्थान देण्याची मुभा देण्यात आली आहे. भारताचे प्रतिनिधित्व न केलेल्या खेळाडूंसह अफगाणिस्तान, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज येथील खेळाडू या लिलावात भाव खाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दहा वर्षांच्या पहिल्या टप्प्यातील हा अखेरचा लिलाव असून पुढील वर्षी सर्व खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असतील. एक संघ जवळपास २७ खेळाडूंना चमूत दाखल करून घेऊ शकतो. मात्र बहुतेक संघमालकांनी २२ ते २४ खेळाडूंचा चमू बनवण्यातच धन्यता मानली आहे. १० लाख ते २ कोटींपर्यंत पायाभूत किंमत असलेले खेळाडू लिलावासाठी उपलब्ध आहेत. दोन कोटी पायाभूत किंमत असलेल्या खेळाडूंमध्ये बेन स्टोक, ख्रिस वोक्स व ईऑन मॉर्गन या इंग्लंडच्या खेळाडूंसह इशांत शर्मा (भारत)़, मिचेल जॉन्सन आणि पॅट कमिन्स (दोन्ही ऑस्ट्रेलिया) यांचा समावेश आहे. मात्र यांच्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० चषक स्पध्रेत उल्लेखनीय खेळी करणाऱ्या युवा भारतीय खेळाडूंना संघात घेण्यासाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. यामध्ये झारखंडचा विराट सिंग आणि मुंबईचा पृथ्वी शॉ यांचा प्रमुख उल्लेख करावा लागेल. याशिवाय तामिळनाडूचा टी. नटराजन, दिल्लीचा कुलवंत खेज्रोलिया आणि केरळचा बासिल थम्पी हेही शर्यतीत आहेत.

इंग्लंडच्या खेळाडूंसाठी हात आखडता

आयपीएलच्या वेळापत्रकादरम्यान इंग्लंडच्या नियोजित मालिका असल्यामुळे एका महिन्यासाठी त्यांच्यावर पैसा खर्च करताना संघमालक हात आखडता घेतील. इंग्लंड ५ व ७ मे रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध दोन एकदिवसीय सामने खेळणार असून २४ मेपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांची तीन सामन्यांची मालिकाही होणार आहे. त्यामुळे ३० एप्रिलनंतर इंग्लंडचे खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध नसतील. वेस्ट इंडिजचा सलामीवीर एव्हिन लेविस आणि दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज कॅगिसो रबाडा हे या लिलावातील केंद्रबिंदू ठरू शकतील. या लिलावात अफगाणिस्तानच्या पाच खेळाडूंचा समावेश करण्यात आला असून, त्यापैकी मोहम्मद शहझाद आणि मोहम्मद नबी यांना निवडून संघ मालक इतिहासाचे साक्षीदार ठरू शकतात.

पुण्याच्या कर्णधारपदावरून धोनीची हकालपट्टी

कोलकाता : इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाच्या कर्णधारपदावरून महेंद्रसिंग धोनीची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय आणि लीग अशा दोन्ही प्रकाराच्या क्रिकेटमधून धोनीच्या नेतृत्वाच्या कारकीर्दीचा अस्त झाला आहे. पुण्याने ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथकडे कर्णधारपद सोपवले आहे.

‘‘धोनीने कर्णधारपदाचा त्याग केलेला नाही. आम्ही आगामी मालिकेसाठी स्मिथची कर्णधार म्हणून नेमणूक केली आहे. मागील हंगाम आमच्यासाठी फारसा समाधानकारक ठरला नव्हता. त्यामुळे आयपीएलच्या दहाव्या हंगामासाठी एखाद्या युवा खेळाडूला कर्णधार नेमण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे,’’ असे रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे मालक संजीव गोयंका यांनी सांगितले.

धोनीने भारताच्या सर्व प्रकारच्या क्रिकेट संघांचे नेतृत्व ३५व्या वर्षी स्वत:हून सोडल्यानंतर त्याची लीगमधील कर्णधारपदावरून हकालपट्टी झाल्याबद्दल क्रिकेट क्षेत्रात आश्चर्य प्रकट करण्यात येत आहे. बंगळुरूमध्ये सोमवारी आयपीएलचा लिलाव होणार असताना आदल्या दिवशी ही घटना घडली आहे.

‘‘नेतृत्व आणि खेळाडू या दोन्ही पातळ्यांवर मी धोनीचा अतिशय आदर करतो. तो संघाचा एक भाग असल्यामुळे संघयशासाठी सर्वोत्तम असलेल्या या निर्णयाला सहकार्य करील,’’ असे गोयंका म्हणाले.

मागील वर्षी पहिल्याच सामन्यात पुण्याने मुंबईला हरवून उत्तम प्रारंभ केला, मात्र केव्हिन पीटरसन, फॅफ डू प्लेसिस आणि स्टीव्हन स्मिथ यांनी दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे त्यांना सातत्य टिकवण्यात अपयश आले. स्मिथने २०१४-१५मध्ये ऑस्ट्रेलियाचे कसोटी कर्णधारपद स्वीकारले. त्यानंतर २०१५च्या विश्वचषकानंतर एकदिवसीय कर्णधारपदसुद्धा त्याच्याकडे सोपवण्यात आले.

स्टार्कची माघार

आयपीएल लिलावाच्या पूर्वसंध्येला ऑस्ट्रेलियाचा हरहुन्नरी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने येत्या आयपीएल हंगामातून माघार घेतली आहे. याचप्रमाणे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू  संघाशी करार संपुष्टात आणला आहे.

‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मिचेल स्टार्क यांनी सहमतीने आगामी आयपीएल हंगामाच्या पाश्र्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. आयपीएल खेळाडूंच्या नियमावलीतील नियम क्रमांक ४१ अनुसार हा करार संपुष्टात आला आहे,’ अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिली.

‘बंगळुरू संघ सोमवारी होणाऱ्या आयपीएल खेळाडूंच्या लिलावाला अतिरिक्त पाच कोटी रुपये आणि परदेशी खेळाडूच्या आणखी एका स्थानावर आता सामोरा जाईल,’ असे बीसीसीआयने म्हटले आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज स्टार्क २०१४च्या हंगामापासून बंगळुरू संघाचा सदस्य होता. स्टार्कने २०१४मध्ये १४ बळी घेतले, तर २०१५मध्ये २० बळी मिळवले.

धोनीचे यशस्वी नेतृत्व : २००८मध्ये आयपीएल पर्वाला प्रारंभ झाल्यापासून एक महागडा आणि सर्वात यशस्वी खेळाडू म्हणून धोनीची ख्याती होती. २००८ ते २०१५ या कालखंडात तो चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार होता. या संघाने २०१० आणि २०११मध्ये सलग आयपीएल विजेतेपदाला गवसणी घातली. याशिवाय २०१० आणि २०१४मध्ये चेन्नईने चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेचे विजेतेपद पटकावले.

untitled-5