News Flash

IPL 2017 Player Auction: कोण आहे कोट्यधीश टायमल मिल्स?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या चमूत मिल्स दाखल

टायमल मिल्स

क्रिकेट संघांचा मेळा आणि मनोरंजनाचा धमाका असणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल २०१७ बद्दलची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. आयपीएलचे यंदाचे हे १० वे पर्व असल्यामुळे क्रिडाप्रेमींमध्येही त्याबद्दलचे कुतुहल पाहायला मिळत आहे. सध्या आयपीएल खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली असून बऱ्याच खेळाडूंवर लाख आणि कोटींच्या घरात बोली लावण्यात आली आहे. काही खेळाडू अनसोल्ड राहिल्याचेही चित्र या लिलावप्रक्रियेदरम्यान पाहायला मिळाले. या सर्वप्रक्रियेमध्ये सर्वांचेच लक्ष वेधले ते म्हणजे इंग्लंडच्या खेळाडूंनी. इंग्लंडच्या क्रिकेट संघातील टायमल मिल्स या खेळाडूविषयीसुद्धा सध्या चर्चा रंगू लागल्या आहेत. वेगवान गोलंदाज असलेल्या टायमलवर बोली लावण्यासाठी मुंबई, पंजाब, दिल्ली या संघांच्या संघमालकांनी स्वारस्य दाखवले होते. इकतेच नव्हे तर, टायमलवर बोली लावण्यासाठीच्या शर्यतीत कोलकाता नाईट रायडर्सचा संघही सहभागी झाला होता. पण, या सर्व संघांमध्ये बाजी मारली ती म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघाने.

१२ कोटींच्या घसघशीत रकमेवर आरसीबीने टायमलला त्यांच्या चमूत दाखल करून घेतले आहे. आरसीबीचा संघ टायमलवर जास्त बोली लावणार अशी अपेक्षा अनेकांनीच केली होती. फलंदाजीची भक्कम फळी असलेल्या आरसीबीच्या संघात प्रभावी गोलंदाजांचा अभाव या संघाच्या यशाच्या मार्गातील एक मोठा अडथळा होता. त्यामुळे टायमलच्या रुपात एका चांगल्या वेगवान गोलंदाजाची वर्णी या संघात लागली आहे असे म्हटले जात आहे. आरसीबी संघाच्या गोलंदाजीविषयी सांगायचे झाले तर स्टार्क वगळता आक्रमक फलंदाजीला आळा घालण्यासाठी इतर कोणताही वेगवान गोलंदाज या संघात पाहिला गेला नव्हता. सध्याच्या घडीला टायमल मिल्सचा फॉर्म पाहता इंग्लंडच्या संघातही त्याच्या गोलंदाजीचा दबदबा पाहण्यास मिळत आहे. ताशी सरासरी १४५ किमीच्या वेगाने गोलंदाजी करणारा टायमल आरसीबीसाठी कितपत फायद्याचा ठरणार हे येत्या काळात कळेलच.

सोशल मीडियावरही टायमल मिल्सविषयीच्या चर्चा रंगत असून त्याची आकडेवारी पाहता या खेळाडंकडून क्रिडाप्रेमींच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. आतापर्यंतच्या कारकिर्दीत टायमल मिल्सचा इकॉनॉमी रेट ७. ४७ इतका असून १७. ७ इतका त्याचा स्ट्राइक रेट असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे, १२ कोटींची बोली लावणाऱ्या आरसीबीच्या संघाला टायमलची वेगवान गोलंदाजी तारणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 12:35 pm

Web Title: ipl 2017 player auction tymal mills englands millionaire player in ipl 2017
Next Stories
1 IPL Auction 2017 Sold & Unsold Players: आयपीएल लिलावात विकले गेलेले आणि न विकले गेलेले खेळाडू कोणते?
2 IPL Player Auction 2017: आयपीएल लिलावप्रक्रियेदरम्यान ‘चुकभूल द्यावी घ्यावी’
3 IPL Auction 2017: स्टोक्सवर बोलीसाठी अंबानींचा हात ‘हवेतच’, पुण्याने मारली बाजी
Just Now!
X