रॉबीन उथप्पा आणि युवा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौल यांच्यात रविवारी हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर भर मैदानात धक्काबुक्कीचा प्रसंग घडला. टी-२० सामना म्हटलं की थरार, जल्लोष आणि खेळाडूंमधील शाब्दिक चकमकी अशा विविध छटांनी परिपूर्ण असलेल्या ‘मनोरंजना’च्या या ‘पॅकेज’मध्ये दिवसागणिक नव्या घटना पाहायला मिळतात. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात उथप्पाने हैदराबादच्या सिद्धार्थ कौल याला जाणूनबुजून धक्का मारल्याचा प्रसंग घडला.

यंदाच्या आयपीएलमध्ये हे दोन्ही संघ जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. दोघांमध्ये गुणतालिकेत अव्वल स्थानासाठी चुरस रंगली आहे. अशावेळी संघाच्या खेळाडूंमध्येही युद्ध रंगलेले पाहायला मिळाले. सामन्याच्या तिसऱ्या षटकात उथप्पाने कौलचे सुरूवातीचे दोन चेंडू खेळून काढले. त्यामुळे उथप्पावर चांगलाच दबाव निर्माण झाला होता. अखेर उथप्पाने चौकार ठोकून षटकाची अखेर केली. डीप मिड विकेटवर फटका लगावल्यानंतर धाव घेत असताना उथप्पाने कौलला धक्का मारला. पुढे उथप्पाने बाचाबाची देखील केली. पंचांनी हस्तक्षेप करून उथप्पाची समजूत काढली. याशिवाय, हैदराबादचा फलंदाज युवराज सिंग देखील मध्यस्थीसाठी पुढे आला. सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तेव्हा पॅव्हेलियनमध्ये परतत असताना युवी उथप्पाच्या खांद्यावर हात टाकून झालेल्या प्रकरणावरून त्याची समजूत काढताना दिसला.