महेंद्रसिंग धोनी उत्तम फिनीशर म्हणून ओळखला जातो. मैदान कोणतेही असो, प्रतिस्पर्धी संघ कोणताही असो, धोनीने अनेकदा भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. आयपीएलमध्येही धोनीमधील उत्तम फिनीशर अनेकदा दिसला आहे. मात्र धोनीच्या नुसत्या खेळपट्टीवर उपस्थितीमुळेही किती फरक पडू शकतो, याचा प्रत्यय सोमवारी पुणे विरुद्ध गुजरात सामन्यात आला. धोनीने दिलेल्या कानमंत्रामुळे फायदा झाल्याचे शतकवीर बेन स्टोक्सने म्हटले.

सोमवारी गुजरात लाईन्सने दिलेल्या १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पुणे सुपरजायंट्सचा संघ ४ बाद ४२ असा संकटात सापडला होता. यावेळी ‘सर्वोत्तम फिनीशीर’ असलेला धोनी मैदानात उतरला होता. त्यामुळे धोनीने संघाची नैय्या पार करावी, अशी पुण्याच्या चाहत्यांची इच्छा होती. मात्र या सामन्यात धोनीने वेगळी भूमिका बजावली. धोनी बेन स्टोक्सला साथ देत खेळपट्टीवर पाय रोवून उभा राहिला. गुजरातच्या गोलंदाजीचा समर्थपणे मुकाबला करत संघाची अधिक पडझड होणार नाही, याची काळजी धोनीने घेतली.

धोनीने दिलेला सल्ला बेन स्टोक्सने अंमलात आणला आणि शानदार शतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला. आयपीएलमधील पहिले शतक झळकावणाऱ्या बेन स्टोक्सला सामनावीप पुरस्काराने गौरवण्यात आले. धोनीप्रमाणेच थंड डोक्याने फलंदाजी करत बेन स्टोक्सने अपेक्षित धावगती आवाक्यात ठेवली. सुरुवातीला विकेट्स गमावल्यामुळे स्टोक्स आणि धोनीवर दबाव वाढला होता. मात्र या दोघांनी खेळपट्टीवर जम बसवल्याने पुण्याने विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली. यामुळे शेवटच्या काही षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी करणे पुण्याच्या फलंदाजांना शक्य झाले.

संघ अडचणीत सापडला असताना आणि बेन स्टोक्स आश्वासक फलंदाजी करताना महेंद्रसिंग धोनीने दुय्यम भूमिका स्वीकारली. बेन स्टोक्स आणि धोनीने पाचव्या विकेटसाठी ७६ धावांची भागिदारी रचली. यामध्ये धोनीने योगदान २६ धावांचे योगदान दिले. धोनी बाद झाल्यावर बेन स्टोक्सने डॅनियल ख्रिश्चनच्या साथीने संघाला विजय मिळवून दिला. स्टोक्सने या सामन्यात ६३ चेंडूंमध्ये १०३ धावांची नाबाद खेळी केली.