एप्रिल-मे महिन्यांचा कालावधी इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या लढतींसाठी ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वाचा अविभाज्य भाग झालेल्या या स्पर्धेचा दहावा हंगाम बुधवारपासून सुरू होत आहे. स्पॉट फिक्सिंग आणि अन्य गैरव्यवहारांनी गालबोट  लागलेल्या या स्पर्धेचा चेहरामोहरा लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीनंतर बदलला आहे. २००८ मध्ये या स्पर्धेचे बिगूल पहिल्यांदा वाजले. यंदाच्या हंगामासह स्पर्धेचा दहा वर्षांचा टप्पा पूर्ण होणार आहे. पुढील वर्षी प्रत्येक संघाची नव्याने संरचना होणार आहे. १४ कोटींची बोली मिळवणारा इंग्लंडचा बेन स्टोक्स यंदाच्या लिलावाचे आकर्षण होते. रायझिंग पुणे सुपरजायंट्सने स्टोक्सला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतले आहे. स्टोक्सचा समावेश गुणतालिकेत तळाचे स्थान राखणाऱ्या पुण्याचे नशीब पालटवू शकतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आम्ही केवळ एका स्पर्धेचा चमत्कार नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादवर आहे. बेंगळुरू संघाला दुखापतींनी ग्रासले आहे. पंजाब संघातही बरेच फेरफार झाले आहेत. दुखापतीतून सावरलेला रोहित शर्मा मुंबई इंडियन्सला विजयपथावर नेण्यासाठी सज्ज झाला आहे. संघात आमूलाग्र बदल झालेला दिल्लीचा संघ ठसा उमटवण्यासाठी आतुर आहे. कोलकाता लौकिकाला साजेसे सातत्य राखण्यासाठी प्रयत्नशील आहे.

ipl-chart1

ipl-chart2

ipl-chart3