आपीएलच्या ११ व्या मोसमातील किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघांमध्ये झालेल्या दुसऱ्या समान्यात पंजाबच्या संघाकडून ओपनिंगला आलेल्या लोकेश राहुलने दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या विरोधात आपल्या संघाला धडाकेबाज सुरुवात करुन दिली. याचबरोबर त्याने आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत वेगवान अर्धशतकाचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. राहुलने १४ चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकले. याद्वारे त्याने युसूफ पठाण आणि सुनील नारायण यांचा विक्रमही तोडला. या दोघांनी १५ चेंडूंमध्ये अर्धशतके ठोकली आहेत.
लोकेश राहुलने आपल्या खेळीमध्ये १६ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकांरांच्या मदतीने ५१ धावा केल्या. त्याने ट्रेंट बोल्टच्या षटकात एक षटकार आणि दोन चौकार लगावले. त्यानंतर शमीच्या षटकातील ३ चेंडू तो खेळला. यामध्ये त्याने १ षटकार आणि १ चौकार मारून १ धाव घेतली. त्यानंतर आलेल्या अमित मिश्राच्या षटकात त्याने २ षटकार आणि ३ चौकार लगावले.
पठाणने २०१४मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळताना सनराइजर्स हैदराबाद या संघाविरोधात सर्वात वेगवान अर्धशतक लागावले होते. त्यानंतर २०१७ मध्ये सुनीलने कोलकाताकडून खेळताना बंगळुरुच्या संघोविरोधात ५० धावा केल्या होत्या. त्यानतंर सुरेश रैना (१६ चेंडू), ख्रिस गेल (१७), अॅडम गिलख्रिस्ट (१७), ख्रिस मोरिस (१७), पोलार्ड (१७), ख्रिस लिन (१९), डेव्हिड मिलर (१९), रॉबिन उथप्पा (१९), आंद्रे रसेल (१९) यांनी अर्धशतके लगावली आहेत.
टी-२० क्रिकेटबाबत सांगायचे झाल्यास सर्वांत वेगवान अर्धशतक युवराज सिंहने १२ चेंडूत लगावले होते. राहुलचे आजचे अर्धशतक हे आजवरचे तिसरे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. त्याच्यापुढे युवराज (१२ चेंडू), ख्रिस गेल (१२) आणि इंग्लंडचा खेळाडू मार्क ट्रेस्कोथिक (१३ चेंडू) हे आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 8, 2018 7:31 pm