घरच्या मैदानावर हैदराबादशी करणार दोन हात

आतापर्यंतच्या पाच सामन्यांतून चार सामने शेवटच्या षटकात हातून निसटल्यामुळे मुंबई इंडियन्स संघ इंडियन प्रीमिअर क्रिकेट लीगमध्ये (आयपीएल) सध्या संघर्ष करत आहे. याच पाश्र्वभूमीवर मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर होणारा सनरायजर्स हैदराबाद विरुद्धचा सामना जिंकून विजयपथावर परतण्याचे मुंबई संघाचे लक्ष्य आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईने दरवर्षीप्रमाणे संथ सुरुवात केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्ध मिळवलेला एकमेव विजय वगळता त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. रविवारी झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात तोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला गेल्यामुळे मुंबईचा संघ कठीण परिस्थितीत सापडला आहे.

स्थानिक खेळाडू सूर्यकुमार यादव व डावखुरा इशान किशन जबरदस्त फॉर्मात आहेत. मात्र मागील सामन्यात दोघेही मोक्याच्या क्षणी बाद झाल्याने पुढील फलंदाजांना मोठे फटके मारणे अवघड गेले. याशिवाय रोहित, इविन लेविस, किरॉन पोलार्ड यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आढळत आहे. विशेषत: पोलार्डने पाच सामन्यांत फक्त ५४ धावा केल्याने त्याच्यावर संघाबाहेर जाण्याची नामुष्की ओढवू शकते. गोलंदाजीत जसप्रीत बुमरा गरजेच्या वेळी बळी टिपून उत्तम गोलंदाजी करत आहे. मात्र शेवटच्या षटकांत त्याच्याच गोलंदाजीवर धावा चोपल्या जात आहेत. मयांक मरकडेवर संघ अवलंबून असून त्याला कृणाल पंडय़ा चांगली साथ देत आहे.

दुसरीकडे कर्णधार केन विल्यम्सनच्या हैदराबाद संघाने सुरुवातीला सगल तीन सामने जिंकून धडाक्यात प्रदर्शन केले. मात्र गेल्या दोन सामन्यात त्यांना अनुक्रमे किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला. चेन्नईविरुद्ध अवघ्या चार धावांनी त्यांचा पराभव झाला. विल्यम्सन सध्या भन्नाट फॉर्मात आहे. पाच सामन्यांत २३० धावांसह तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत संजू सॅमसन व विराट कोहलीपाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु शिखर धवनच्या अनुपस्थितीत त्याला साथ देण्यासाठी एकही फलंदाज पुढे सरसावलेला नाही. मनीष पांडे, दीपक हुडा, युसुफ पठाण यांनी संघाला विजयीरेषा पार करेपर्यंत खेळपट्टीवर टिकणे महत्त्वाचे आहे. गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार टिच्चून गोलंदाजी करत आहे.

या सामन्यात विजय मिळवून मुंबईचा संघ सल्लागार सचिन तेंडुलकरला वाढदिवसाची भेट देणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.

  • सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्सवर.