मुंबई-बेंगळूरु यांच्यात रंगणार कडवी झुंज

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) अनुक्रमे सहाव्या व सातव्या स्थानावर असणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु संघांमध्ये मंगळवारी स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी घमासान होणार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या या सामन्यात कोणता संघ आपल्या प्रतिस्पध्र्यावर कुरघोडी करतो, हे पाहणे रंजक ठरेल.

कर्णधार रोहित शर्मा फॉर्मात परतल्याने मुंबईला दिलासा मिळाला आहे. मुंबईचे सूर्यकुमार यादव, इशान किशन, एविन लेविस हे फलंदाजसुद्धा बऱ्यापैकी कामगिरी करत आहेत. मात्र, किरॉन पोलार्ड आणि हार्दिक पंडय़ाविषयी संघाला लवकरच निर्णय घ्यावा लागेल. गोलंदाजीत युवा फिरकीपटू मयांक मरकडेच्या कामगिरीवर संघ अवलंबून आहे. त्याला जसप्रीत बुमराह, मिशेल मॅक्लिनघन, क्रुणाल पंडय़ा यांची साथ मिळणे आवश्यक आहे.

दुसरीकडे बेंगळूरुचा कर्णधार विराट कोहली, क्विंटन डी’कॉक, मंदिप सिंग सर्वच खोऱ्याने धावा लुटत आहेत. तापामुळे मागील सामन्याला मुकणारा एबी डी’व्हिलियर्स पूर्ण तंदुरुस्त असला तर, बेंगळूरुची फलंदाजी बळकट होईल. मात्र, गोलंदाजी ही बेंगळूरुसाठी मुख्य चिंतेचा विषय बनली आहे. उमेश यादव, मोहम्मद सिराज, टिम साउदी यांच्याकडून सुधारित गोलंदाजी संघाला या सामन्यात अपेक्षित असेल.

  • सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्सवर